News Flash

स्वबळावरील लढतीने सोलापुरात राजकीय समीकरणे बदलली

विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,भाजप व शिवसेना हे चारही प्रमुख पक्ष स्वबळावर लढणार असल्यामुळे सोलापूर जिल्ह्य़ात राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. या

| September 27, 2014 02:10 am

विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,भाजप व शिवसेना हे चारही प्रमुख पक्ष स्वबळावर लढणार असल्यामुळे सोलापूर जिल्ह्य़ात राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. या चौरंगी लढतीत निवडणूक अनिश्चित झाली आहे.
हिंदुत्वाच्या नावावर गेली २५ वर्षे शिवसेना व भाजपने तर गेली २५ वर्षे धर्मनिरपेक्षतेच्या मुद्दय़ावर एकत्र येऊन सत्ता चालविणाऱ्या काँग्रेस व राष्टवादीने एकमेकांशी काडीमोड घेतली आहे. त्यामुळे आता स्वच्छ स्वरूपात बहुरंगी पर्याय मतदारांपुढे तयार झाले आहेत. त्याचे पडसाद सोलापूर जिल्ह्य़ातही उमटणे स्वाभाविक आहे. या चार प्रमुख पक्षांसह मनसे व इतर राजकीय आघाडय़ांमुळे बहुरंगी लढती अपेक्षित आहेत.
मागील २००९ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्य़ात ११ जागांपैकी राष्ट्रवादीचे ४, काँग्रेसचे २, भाजपचे २ तसेच शेकापचा एक तसेच दोन अपक्ष (एक काँग्रेस सहयोगी तर दुसरा राष्ट्रवादी सहयोगी) असे पक्षीय बलाबल होते. लोकसभा निवडणुकीतील मोदी लाटेचा प्रभाव असल्याच्या पाश्र्वभूमीवर गेल्या पंधरा वर्षांच्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या राजवटीच्या विरोधात नाराजीचे वातावरण आहे. परंतु महायुती व आघाडी दोन्ही तुटल्यामुळे नव्याने राजकीय समीकरणे निर्माण होत आहेत.
काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर आता त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे सोलापूर शहर मध्यमध्ये दुसऱ्यांदा भवितव्य अजमावत आहेत. १९७८ सालापासून सुशीलकुमार शिंदे यांच्या निवडणुकांचे राजकारण पाहणारे त्यांचे घनिष्ठ सहकारी विष्णुपंत कोठे व त्यांचे पुत्र महेश कोठे हे शिंदे यांची साथ सोडून शिवसेनेत दाखल झाले आहेत. महेश कोठे हे सेनेचे संभाव्य उमेदवार आहेत. त्यामुळे कोठे यांच्या उपद्रव शक्तीचा अंदाज विचारात घेता शिंदे यांची डोकेदुखी वाढत असतानाच आता आघाडीत बिघाडी झाली. यात पुन्हा एमआयएम संघटनेचाही उपद्रव सुरू झाला. त्यामुळे शिंदे यांच्या पुढील अडचणी वाढल्या आहेत.
भाजपचा बालेकिल्ला असलेल्या सोलापूर शहर उत्तरमध्ये पक्षाचे शहराध्यक्ष आमदार विजय देशमुख यांच्या विरोधात पक्षांतर्गत विरोधकांनी उठाव करून अपशकून केला आहे. आता युती नसल्यामुळे शिवसेनेची मदत मिळणे दुरापास्त झाले आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी शक्ती पणाला लावली असताना राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे यांनी उमेदवारी आणली आहे. अक्कलकोटची जागा भाजपचे आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्याकडून हिसकावून घेण्याची तयारी काँग्रेसचे माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे हे करीत असताना त्यांच्या समोर आता राष्ट्रवादीही स्वतंत्रपणे लढणार असल्यामुळे म्हेत्रे हे चांगलेच अडचणीत येऊ शकतात. सोलापूर दक्षिणमध्ये काँग्रेसचे आमदार दिलीप माने यांना पक्षांतर्गत विरोधकांबरोबर बहि:स्थ शत्रूंचा मुकाबला करावा लागणार आहे. युतीत ही जागा सेनेकडे होती. परंतु भाजपचे माजी खासदार सुभाष देशमुख हे उत्तम पर्याय देण्यासाठी पुढे आले आहेत. यात काँग्रेसचे भवितव्य धोक्यात येऊ शकते. मोहोळमध्ये राष्ट्रवादीच्या विरोधात काँग्रेसची ताकद क्षीण आहे. तर शिवसेना व भाजप एकमेकास तुल्यबळ आहेत. सेना व भाजप स्वतंत्रपणे लढल्यास राष्ट्रवादीला लाभ मिळण्याची शक्यता वर्तविली जाते.
अलीकडेच काँग्रेसमध्ये गेलेले अपक्ष आमदार भारत भालके यांच्या विरोधात पंढरपूर-मंगळवेढय़ातून राष्ट्रवादीचे सुधाकर परिचारक यांचे पुतणे प्रशांत परिचारक हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आव्हान देत आहेत. यात कोण बाजी मारणार, याचा फैसला राष्ट्रवादीवर अवलंबून आहे. शिवसेनेचा उपद्रव परिचारक यांना होऊ शकतो. माढय़ात राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांच्या विरोधात काँग्रेसचे माजी आमदार धनाजी साठे यांचे पुत्र दादासाहेब साठे, सेनेकडून कल्याणराव काळे किंवा प्रा. शिवाजी सावंत आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून संजय पाटील-घाटणेकर अशी गर्दी झाल्यास त्याचा फायदा राष्ट्रवादीला होण्याची शक्यता राजकीय जाणकार बोलून दाखवितात. सांगोल्यात शेकापचे नेते गणपतराव देशमुख यांच्या विरोधात काँग्रेसमधून सेनेत गेलेले माजी आमदार शहाजी पाटील यांचेच आव्हान आहे. करमाळ्यात राष्ट्रवादीच्या आमदार श्यामल बागल यांच्या कन्या रश्मी बागल-कोलते यांची उमेदवारी आली असताना त्यांच्या विरोधात काँग्रेसचे माजी आमदार जयवंत जगताप, सेनेचे नारायण पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संजय शिंदे अशा लढती होत आहे. माळशिरसमध्ये मोहिते-पाटील गटाच्या प्रभावाखालील राष्ट्रवादीच्या विरोधात आतापर्यंत काँग्रेससह भाजप, सेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना आदी सर्वच पक्षसंघटना एकत्रपणे लढतात. परंतु आता विरोधकात फूट पडल्यास त्याचा लाभ राष्ट्रवादीला होऊ शकतो. बार्शीतही राष्ट्रवादीचे दिलीप सोपल व सेनेचे राजेंद्र राऊत या दोघा तुल्यबळ नेत्यांतच लढत होत असताना त्यात बहुरंगी लढतीचा लाभ कोण घेणार, याचे गणित सुटणे कठीण आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2014 2:10 am

Web Title: change of political equally in solapur
टॅग : Election,Solapur
Next Stories
1 ‘तण’ काढून मतदारांनी चांगले उमेदवार निवडावे- शरद पवार
2 भाजपचे कराड, निलंगेकर, भालेराव यांचे अर्ज दाखल
3 उस्मानाबादमध्ये राजेनिंबाळकर, तुळजापुरात चव्हाण यांचा अर्ज
Just Now!
X