प्रकृती अस्वास्थ्यामुळे जामीन देण्यात यावे अशी मागणी करणारी याचिका छगन भुजबळ यांच्यावतीने मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. चुकीच्या पद्धतीने अटक करुन खटला सुरु केल्याचा दावाही भुजबळ यांच्यावतीने हायकोर्टात करण्यात आला आहे. भुजबळ यांच्या याचिकेवर २२ नोव्हेंबररोजी सुनावणी होणार आहे.

महाराष्ट्र सदन घोटाळा आणि बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे सध्या तुरुंगात आहेत. मार्च महिन्यात भुजबळ यांना अटक करण्यात आली होती. सक्तवसुली महासंचालनालयाने ८६० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी भुजबळांवर कारवाईचा बडगा उगारला होता. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) त्यांच्याविरोधात खटला सुरु आहे. तुरुंगात असताना प्रकृती खालावल्याने भुजबळ यांना रुग्णालयातही दाखल करावे लागले होते. भुजबळ यांनी यापूर्वीदेखील जामीनासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र हायकोर्टाने त्यांना जामीन नाकारला होता. आता पुन्हा एकदा छगन भुजबळ यांनी मुंबई हायकोर्टाचे दार ठोठावले आहेत.

गुरुवारी छगन भुजबळ यांच्यावतीने हायकोर्टात जामीनासाठी याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेत भुजबळ यांनी प्रकृती अस्वास्थ्याचा मुद्दाही उपस्थित केला. तसेच आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींनाही त्यांनी आव्हान दिले आहे. अवैधपद्धतीने अटक केल्याचा दावा त्यांनी हायकोर्टात केला आहे.