‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून महाराष्ट्रासह देशात गदारोळ सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना केल्यानं राजकीय नेत्यांसह लोकांमधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. या पुस्तकावर बंदी आणावी अशी मागणीही होत आहे. या पुस्तकाच दिल्लीत प्रकाशन झाल्यानंतर लोकसत्तानं ही बातमी प्रसिद्ध केली. यावेळी जिजाऊ जयंतीनिमित्त सिंदखेड राजा येथे सभेत बोलत असलेल्या छत्रपती संभाजीराजे यांनी याच वृत्ताचा हवाला देत पुस्तकावर बंदी आणण्याची मागणी केली.

जय भगवान गोयल यांनी लिहिलेल्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे दिल्ली भाजपाच्या कार्यालयात रविवारी प्रकाशन करण्यात आलं. या पुस्तकाच्या प्रकाशनाचं वृत्त लोकसत्तानं दिलं. या पुस्तकारवरून भाजपावर टीकेची झोड उठली. सोशल मीडियातून लोकांची तीव्र प्रतिक्रिया आल्या. दरम्यान, पुस्तकावरून चर्चा सुरू झाली, त्यावेळी छत्रपती संभाजीराजे जिजाऊ जयंतीनिमित्त सिंदखेड राजा येथे हजर होते. यावेळी त्यांचं भाषण सुरू असतानाच त्यांना हे वृत्त कळालं. त्यांनी लोकसत्ता डॉट कॉमचा हवाला देत ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तकावर टीका केली.

संभाजीराजे म्हणाले, “लोकसत्तामध्ये आलं आहे. पुस्तकाचं नाव आहे, आज के शिवाजी नरेंद्र मोदी. प्रकाशन झालंय दिल्लीमध्ये. प्रकाशन झालंय भाजपाच्या कार्यालयात. नरेंद्र मोदी त्यांच्या ठिकाणी मोठे आहेत. पंतप्रधान म्हणून ते दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. त्याचा आम्ही आदर करतो. त्यांची तुलना किंबहुना कुणाचीही तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी होऊ शकत नाही. म्हणून त्या पुस्तकावर भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी बंदी आणली पाहिजे. कोणत्याही माणसाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी होऊ शकत नाही. छत्रपतींच्या घरात माझा जन्म झालाय म्हणून मला हे बोलण्याचा अधिकार आहे,” असं संभाजीराजे यावेळी म्हणाले होते.