छत्रपती शिवाजी महाराज आमि संभाजी महाराजांच्या विचारांमध्ये आजही देश तारण्याची ताकद आहे असे वक्तव्य संभाजी भिडे गुरुजी यांनी केले आहे. हिंदुस्थान हे एक राष्ट्र आहे. सगळे राजकीय पक्ष हे आपल्या स्वार्थासाठी आणि राजकारणासाठी काम करत आहेत. राष्ट्राला कणखर भवितव्य नाही. ते प्राप्त करण्यासाठी आणि देशप्रेमाने भारावलेला भेदाभेद विरहित माणूस उभा करण्यासाठी गडकोट मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे असेही शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे प्रमुख संभाजी भिडे यांनी गडकोट मोहिमेच्या सांगता प्रसंगी म्हटले आहे.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने प्रतापगड ते रायरेश्वर जावळी अरण्यमार्गे आयोजित करण्यात आलेल्या मोहिमेचा समारोप आज जांभळी तालुका वाई या ठिकाणी करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई, अभिनेते राहुल सोलापूरकर, डॉक्टर मुकुंद दातार, आमदार सुधीर गाडगीळ, रमेश कोंडे या सगळ्यांचीही उपस्थिती होती. देशासाठी जगावे आणि देशासाठी मरावे हे आजच्या पिढीला शिकवण्याची गरज आहे. सह्याद्रीच्या गडकोटात आणि तेथील वातावरणात मनावर, विचारांवर परिणाम करण्याची ताकद आहे. कन्याकुमारी ते काश्मीर या परिसरातील प्रत्येकाला शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज ठाऊक असलेच पाहिजेत त्यांचे विचार संपूर्ण देशासाठी गरजेचे आहेत असेही मत भिडे गुरुजींनी यावेळी मांडले. तसेच पुढील महिन्यात धर्मवीर संभाजी बलिदान मास राज्यातील ३६ हजार ८०० ग्रामपंचायतींमध्ये पाळला जावा असेही आवाहन त्यांनी केले.

बत्तीस मण सोन्याचे सिंहासन, त्यावरील सोन्याची मूर्ती, सोन्याची छत्री यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाची मदत आम्ही घेणार नाही. सगळे धारकरी आणि सर्वसामान्य यांच्या मदतीतूनच सिंहासनाचा संकल्प पूर्ण केला जाईल असेही भिडे गुरुजींनी स्पष्ट केले. पुण्यात ७ जुलै २०१८ रोजी संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांच्या पालख्या दाखल होतील, भक्ती गंगा आणि शक्ती संगम यांच्या दर्शनासाठी पुण्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहा असेही आवाहन त्यांनी केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी यावेळी शिवाजी महाराजांचे युद्धतंत्र कसे होते ते सांगितले. तर डॉक्टर मुकुंद दातार यांनी त्यांच्या आयुष्यावर असलेला शिवाजी महाराजांचा प्रभाव कसा आहे ते सांगितले. पहाटे साडेचारच्या सुमारास धारकऱ्यांच्या दिवसाच्या उपक्रमाची सुरुवात झाली. सूर्यनमस्कार, बैठका, प्रेरणामंत्राने उपक्रम सुरु झाला. कवि भूषण यांचे छंद म्हणण्यात आले. सकाळी साडेसहा वाजता झेंडा रायरेश्वराकडून जांभळी पुलावरील समारोप स्थळाकडे रवाना झाला. स्फूर्ती गीत आणि ध्येयगीत म्हणत धारकऱ्यांनी रायरेश्वर सोडला आणि त्यानंतर ध्येयमंत्र म्हणून गडकोट मोहिमेचा समारोप करण्यात आला.