|| नितीन पखाले

राजकीय वर्तुळात चर्चा :- यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था गटातून नवनियुक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधानपरिषदेवर जाणार असल्याची चर्चा आहे. आमदार तानाजी सावंत विधानसभेवर निवडून गेल्याने ही जागा रिक्त झाली आहे.

उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर विधानमंडळात जाण्याकरिता त्यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघाचा शोध सुरू झाला. त्यातूनच त्यांनी यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडणूक लढवून विधान परिषदेवर जावे, हा पर्याय समोर आल्याचे शिवसेनेच्या गोटातून सांगण्यात येते.

प्रा. तानाजी सावंत यांनी २०१६ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या गटातून निवडणूक लढवली होती. ठाकरे यांनी येथील आ. संजय राठोड यांच्यावर सावंत यांना निवडून आणण्याची जबाबदारी सोपवली होती. डिसेंबर २०१६ मध्ये तानाजी सावंत हे यवतमाळमधून विधान परिषदेवर निवडून गेले. विधान परिषदेवर सहा वर्षांचा कालावधी पूर्ण व्हायच्या आधीच आ. तानाजी सावंत यांनी नुकतीच उस्मानाबाद जिल्ह्यतील भूम परांडा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवून ते विजयी झाले. त्यामुळे यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा रिक्त झाली. ही जागा शिवसेनेकडे आहे परंतु, निवडणूक निकालानंतर महायुतीत भाजपने या जागेवर दावा सांगितला होता. मात्र त्यानंतर झालेल्या राजकीय उलथापालथीत महायुती तुटली. त्यामुळे आता यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवर शिवसेनेचा दावा कायम आहे. येत्या सहा महिन्यांत ही निवडणूक होणार आहे. भविष्यात या जागेबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेतात, ही बाबही महत्त्वाची ठरणार आहे. शिवसेना या जागेवर कोणता नवीन चेहरा देणार, याकडे येथील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, विधान परिषदेवर पाठवण्याची रणनीती शिवसेनेने आखल्याचे समजते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद सदस्यत्वाचा कालावधी आणखी तीन वर्षे आहे. त्यामुळे विधानसभेत नुकत्याच निवडून आलेल्या पक्षाच्या एखाद्या आमदाराचा राजीनामा घेऊ न विधानसभा निवडणूक लढण्यापेक्षा मुख्यमंत्री ठाकरेंसाठी यवतमाळातून विधान परिषदेवर निवडून जाणे, हा सोयीचा मार्ग आहे. सध्या रिक्त जागेवर निवडून जा, पुढील रणनीती तीन वर्षांनंतर आखता येईल, असाही एक मतप्रवाह पक्षात आहे.

याबाबत अद्याप स्थानिक पातळीवर काही ठरले नाही. वरिष्ठ पातळीवर काही ठरले असल्यास कल्पना नाही. पंरतु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपरोक्त शक्यता नाकारता येत नाही. पक्षपातळीवर हा निर्णय झाल्यास तो जिल्यातील शिवसैनिकांसाठी अभिमानाचा क्षण असेल, अशी प्रतिक्रिया शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारताच  दिग्रसचे शिवसेना आमदार संजय राठोड यांनी त्यांची भेट घेऊ न शुभेच्छा दिल्या व चर्चा केली. संजय राठोड यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वीही युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकरिता दिग्रस विधानसभा मतदारसंघ सोडण्याची तयारी दाखवली होती. मात्र आदित्य मुंबईतून लढले व विजयी झाले. आता योगायोगाने पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना सहा महिन्यात विधिमंडळाचे सदस्य व्हायचे आहे आणि यवतमाळ विधान परिषदेची जागाही रिक्त आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयाकडे शिवसैनिकांचे लक्ष आहे.