सप्टेंबर २०१९ मध्ये नालासोपारा येथील युनायटेड पेट्रोल फायनान्स गोल्ड व्हर्च्युअल लोन शॉपमध्ये टाकण्यात आलेल्या दरोड्यात छोटा राजन टोळीच्या सदस्यांचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून या प्रकरणात दहा आरोपींना अटक करण्यात आले आहे. या टोळी मार्फत मुंबई, पालघर व गुजरात येथे संघटित पद्धतीने इतर अनेक दरोडे टाकण्याचे प्रकार उघडकीस आले असून आरोपींना मोका कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

नालासोपारा येथे २० सप्टेंबर २०१९ रोजी दरोडा टाकून या टोळीने १ कोटी ७७ लक्ष रूपये किमतीची रोख रक्कम आणि मुद्देमाल चोरी केला होता. याप्रकरणी पालघर पोलिसांनी यापूर्वी चार आरोपींना पकडले होते. पकडलेले आरोपी संघठीत पद्धतीने दरोडा टाकणाऱ्या टोळीचे सदस्य असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर याप्रकरणी केलेल्या तपासात यापैकी काही सदस्य छोटा राजन टोळीचे सदस्य असल्याचे निष्पन्न झाले. तसेच या २०१३ मध्ये ॲक्सिस बँक एटीएमवर दरोडा टाकून रोख रक्कम पळवल्याचा प्रकारासह टोळीने जवाहिऱ्याच्या व्यापारी व मुंबई, सुरत व इतर ठिकाणी दरोडा टाकल्याची निष्पन्न झाले आहे.

या आरोपींकडून १ कोटी ८२ लाख रुपयांहून अधिक रकमेचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषसिद्धतेसाठी पुरावे जमा केल्याची माहिती पालघरचे पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिली. या गुन्ह्यातील गांभीर्य पाहून या आरोपींना महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोका) अंतर्गत गुन्हा नोंदवला आला असून तपासही सुरु करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या प्रकरणी पोलिसांनी ३ किलो ८११ ग्राम सोने, एक रिव्हॉल्वर, एक पिस्तूल, आठ जिवंत काडतुसे व दोन वाहनं हस्तगत केली आहेत.