अभिनेता अजय देवगण आणि सैफ अली खान यांची मुख्य भूमिका असलेला ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ हा ऐतिहासिकपट सध्या तिकीट खिडकीवर तुफान चालत आहे. या चित्रपटातील काही प्रसंगाला मॉर्फिंग केलं आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, नरवीर तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यावर अमित शाह यांचा चेहरा लावण्यात आला आहे. सध्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिकेला पोहचला आहे. त्याच पार्श्वभूमीवर पोलिटिकल कीडा या ट्विटर हँडलवरून हा मार्फ केलेला व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यावर आता छत्रपती संभाजी राजे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

पुस्तक झालं आता व्हिडीओ आला. हा प्रकार अशोभनीय, असहनिय तसेच निंदनीय आहे. संबंधित पक्षाने यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. केंद्र सरकारने चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी छत्रपती संभाजी राजे यांनी केली आहे. या प्रकरणावर ट्विट करून त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

आम्हा शिवभक्तांसाठी महाराज सर्वस्व आहेत. शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत. सरकारची जबाबदारी आहे, आमच्या भावनांची कदर करत अशा गोष्टी होऊ नयेत यासाठी दक्षता घ्यावी. सर्व राजकीय पक्षांना-कार्यकर्त्यांना विनंती आहे, कोणीही गलिच्छ राजकारणासाठी महाराजांच्या प्रतिमेचा गैरवापर करु नये, असं आवाहनही त्यांनी ट्विटरद्वारे केलं आहे.

पोलिटिकल कीडा या ट्विटर हँडलवरून हा मॉर्फ केलेला व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या प्रकारावर ट्विटवरून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. सायबर सेलला टॅग करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ट्विटरवर करण्यात येत आहे.

आणखी वाचा – मोदींची पुन्हा शिवाजी महाराजांशी, तर तान्हाजींची अमित शाहांशी तुलना

काय आहे नेमकं या व्हिडीओत?
या व्हिडीओत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, नरवीर तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यावर अमित शाह आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उदयभान राठोड दाखवण्यात आले आहे. हा व्हिडीओ भाजपाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट केलेला नाही. नरेंद्र मोदी व अमित शाह हे कोंढाणा किल्ल्याप्रमाणे दिल्लीसाठी युद्ध करायला तयार असल्याचे या व्हिडीओत दाखविण्यात आले आहे. ‘शाहीन बाग से उन्होंने वोट बँक की राजनिती शुरू की है, आखरी दांव हम खेलेंगे,’ असे संवादही यात घालण्यात आले आहेत.