रवींद्र केसकर

कलाकेंद्रात काम करणाऱ्या कलावंतांना बक्कळ पैसे मिळतात असा अनेकांचा गैरसमज आहे. त्यामुळेच लोककलावंतांकडे नेहमी दुर्लक्ष केले जाते. एकीकडे सिनेमा आणि टीव्ही मालिकांतील कलाकारांना काम करण्याची मुभा दिली जात आहे. तर लोककलावंतांच्या कामावर आजही निर्बंध कायम आहेत. जीव निघून जाईल इतकेही दुर्लक्ष आमच्याकडे करू नका. सिनेकलाकारांची काळजी घेत असतानाच उपासमारीमुळे आमच्या आतड्याला पडलेला पीळ पाहण्याचीही तसदी घ्या, अशा शब्दांत कला केंद्रचालक असलेल्या निर्मला जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भावनिक आवाहन केले आहे.

सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर चोराखळी गावानजीक कालिका कला केंद्र आहे. मागील २० वर्षांपासून या क्षेत्रात असलेल्या निर्मला जाधव हे केंद्र चालवित आहेत. त्यांच्या कालाकेंद्रात सध्या सात पार्ट्या आहेत. पार्ट्या म्हणजे कलाकारांचे पथक. चैत्र महिन्यातील यात्रा आणि श्रावण महिन्यातील व्यवसाय यातून वर्षभराची बिदागी सहज उपलब्ध होते. मात्र, यंदा याच काळात करोनाच्या संकटाने ठाण मांडले. यात्रा रद्द झाल्या आणि श्रावण महिना वैशाख महिन्याच्या उन्हासारखा रखरखीत निघून गेला. त्यामुळे आता केंद्रातील कलाकारांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली असल्याची माहिती निर्मला यांनी दिली. आमच्याप्रमाणे राज्यभरातील अनेक कालाकेंद्रात अशीच परिस्थिती असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रत्येक मुलीच्या मागे आठ-दहा लोकांचा परिवार आहे. पायातले चाळ पाच महिन्यापासून धूळ खात पडले आहेत. कलाकारांची कला बंद ठेवली तर उदरनिर्वाह कसा चालणार असा रोकडा सवालही त्या उपस्थित करतात.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वेल्फेअर फंडातून प्रत्येक कलाकारांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा करण्यात आले. मात्र, अनेक जणींचे बँकेत खातेच नाही. त्यामुळे त्यांना हा लाभही मिळू शकला नाही. २५ वर्षीय शांता इंगळे यांच्याकडे आधार कार्ड नसल्याने बँकेत खाते उघडले नाही. परिणामी ना लाभ मिळाला ना कुठले अनुदान. आता तर कलाकेंद्रच ठप्प आहे. मालकिणीच्या आधारमुळे कसेबसे दिवस काढत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

अकरावीपर्यंत शिक्षण झालेल्या मंजूची अवस्था तर त्याहूनही बिकट आहे. चार वर्षाचा मुलगा आणि उतारवयाला लागलेल्या आजीच्या चरितार्थाची जबाबदारीही तिच्यावरच आहे. गावात जाऊन अन्य कोणते काम करण्याचा प्रयत्न केला तर लोकं वाईट नजरेने पाहतात त्यामुळे बाहेर कामही मिळत नाही. उस्मानाबाद शहरात खोली करून काम करण्यासाठी गेले होते. सोबत कालाकेंद्रातील काहीजणी होत्या. मात्र त्याभागतील लोकांनी पोलिसांना बोलावून आम्हाला घराबाहेर काढून हाकलून दिले. त्यामुळे पुन्हा कालाकेंद्राचाच आधार घेण्याची वेळ आपल्यावर आली असल्याचे तिने डोळ्यात पाणी आणून सांगितले.