“राज्यातील सिनेमागृहे सुरु करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने पुढाकार घेऊन याबाबत एसओपी (आदर्श कार्यपध्दती) तयार केल्या आहेत. पण या एसओपी निश्चित झाल्यावर सिनेमागृहे सुरु करण्याबाबत विचार करण्यात येईल,” अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज एका बैठकीत दिली. करोनामुळे राज्यातील सिनेमागृहे गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ बंद असून, याअनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मल्टिप्लेक्स, सिनेमागृहांच्या मालकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील सिनेमागृहे लवकरच सुरू करण्याबाबत आश्वासन दिलं.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, “राज्यातील करोनाचं संकट मोठं असून, या संकटकाळात सिनेमागृहांचे मालक शासनासोबत आहेत याचे समाधान आहे. सिनेमा चालण्यासाठी सिनेमागृहांची आवश्यकता असते, हे जरी खरे असले तरी महाराष्ट्रानं ‘पुनश्च हरिओम’ करीत कामगारांना काम मिळावे यासाठी उद्योग क्षेत्र सुरु केले. त्यानंतर हॉटेल, रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने सुरु करण्याबाबत नुकतीच परवानगी देण्यात आली. आता मेट्रो सेवा सुरु करण्यात आली आहे, रेल्वेमध्ये गर्दी होऊ नये यासाठी लोकलच्या फेऱ्याही वाढविण्यात आल्या आहेत. राज्यातील सिनेमागृहांबाबतही सकारात्मकता ठेवून निश्चित करण्यात आलेल्या एसओपीनुसार सिनेमागृहे सुरु करण्यात येतील. आतापर्यंत अनेक व्यवहार बंद होते ते आपण एकेक सुरू करत आहोत. मनोरंजन क्षेत्र हे राज्याच्या अर्थचक्राला गती देणारे क्षेत्र आहे. हे क्षेत्र बंद ठेवण्यात आपल्याला किंवा शासनाला आनंद नाही,” असं मुख्यमंत्री म्हणाले.
“आपल्याला जगभरात काही देशांमध्ये करोनाचा संसर्ग वाढल्याने युरोप, ऑस्ट्रेलिया, स्वीडन यासारख्या ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन करावा लागला. हिवाळ्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, असा इशारा देण्यात आल्याने आपल्याला काळजीपूर्वक पुढे जायचे आहे. महाराष्ट्रात आपण अनलॉक टप्प्याटप्प्याने करण्यामागे महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ नये हाच उद्देश आहे. सिनेमागृहांमध्ये वातानुकुलित वातावरण आहे. प्रेक्षक सिनेमा पहायला आल्यानंतर किमान दोन तास बंदिस्त ठिकाणी असतो. त्यावेळी त्याला संसर्ग होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. सिनेमागृहांमधील स्वच्छता पाळली जाणे, सिनेमागृहे वेळोवेळी सॅनिटाईज करण्यात येणे, सिनेमागृहात एकूण आसनक्षमतेच्या फक्त ५० टक्के प्रेक्षक असणे, या बाबी पाळल्या जाणं गरजेचं आहे. एसओपीचं पालन, स्वच्छता, सुरक्षितता, प्रेक्षकांनी मास्क लावणं, सॅनिटाईज करणं आणि शारीरिक अंतर पाळणं हे गरजेचं आहे,” असं मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 15, 2020 4:09 pm