चित्त्याच्या चपळाईने चेंडूवर नियंत्रण मिळवायचे.. त्याच चपळाईने प्रतिस्पध्र्यानी रचलेले चक्रव्यूह भेदत चेंडू गोलजाळ्यापर्यंत घेऊन जायचा.. आणि गोल करायचा.. फुटबॉलमधली ही चित्तथरारकता निव्वळ वर्णनातीत..खेळाच्या या चित्तथरारकतेतूनच मग पेले, दिएगो मॅराडोना यांसारखे लोकोत्तर खेळाडू तयार होतात. घरात दारिद्रय असूनही त्यांचे पाय मैदानावरून मागे हटले नाहीत ते या खेळावरील प्रेमामुळेच.. त्यामुळेच संधीची सर्व दारे त्यांच्यासाठी सताड खुली होतात.. मात्र, हे प्रत्येकवेळी शक्य होतेच असे नाही. औरंगाबादच्या सरुताई कुंभारची हीच व्यथा आहे.. उत्तम फुटबॉलपटू असूनही केवळ विद्यापीठ स्तरावर मुलींचा फुटबॉल संघ नसल्याने सरुताईवर फुटबॉलमधले ‘रेडकार्ड ‘ मिळण्याची वेळ आली आहे.. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने सरुताईलाही औरंगाबादबाहेरील महाविद्यालयात प्रवेश घेता येणेही शक्य नाही.
घरात दारिद्रय, मोलमजुरी करणारे वडील आणि सततच्या आजारपणामुळे अंथरुणाला खिळलेली आई अशा प्रतिकूल परिस्थितीतही सरुताई कुंभार (२०) ही फुटबॉलपटू घडली ती केवळ जिद्दीच्या जोरावर. सातव्या वर्गात असतानाच सरुताईला फुटबॉलची आवड निर्माण झाली. पायाने चेंडूवर नियंत्रण मिळवून प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना झुंजवण्याच्या शैलीची तिला भुरळ पडली. अन तिचीही पावले आपोआप या खेळाकडे वळली. छंद म्हणून जोपासलेल्या फुटबॉलमध्ये अवघ्या वर्षभरात सरुताईने आपली ओळख निर्माण केली. त्याच बळावर तिने महाराष्ट्राच्या १४ व्या वर्षांखालील संघात स्थान पटकावले. १४, १७ व १९ वर्षांखालील वयोगटातील राष्ट्रीय स्पर्धामध्ये महाराष्ट्रचे प्रतिनिधित्व करणारी सरुताई उत्तम
बचावपटू आहे. राष्ट्रीय स्पर्धामध्ये चमक दाखवणाऱ्या सरुताईची ही यशोगाथा मात्र आता थांबण्याची चिन्हे आहेत.  

मला खरे तर फुटबॉलपटू म्हणून कारकीर्द घडवायची होती. पण आता परिस्थितीमुळे हा खेळच सोडावा लागणार आहे.
– सरुताई कुंभार, फुटबॉलपटू