मीरा-भाईंदर शहराला अनधिकृत फेरीवाले आणि वाहतूक कोंडी या समस्यांनी ग्रासले आहे. शहर झपाटय़ाने वाढत असताना त्यासोबत दिवसांगणीक वाढणारी वाहने, त्या तुलनेत कमी पडणारे रस्ते, एक दिशा मार्ग, बेकायदा वाहनतळांचे नियोजन नसणे त्यातच सातत्याने वाढणाऱ्या फेरीवाल्यांसाठी धोरण नसणे याचा परिणाम शहर विकासावर होत आहे.

नागरिकांच्या मनात याबद्दल असलेल्या असंतोषाला ‘लोकसत्ता लाऊडस्पीकर’ या कार्यक्रमात वाट मोकळी करून दिली जाणार आहे. शनिवार, १७ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ वाजता भाईंदर पश्चिमेकडील नगरभवन सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.

मीरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त बालाजी खतगांवकर, मीरा-भाईंदर विभागाचे पोलीस उपअधीक्षक शांताराम वळवी या कार्यक्रमात उपस्थित राहून नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देणार आहेत.

भाईंदर पूर्व आणि पश्चिम परिसरातील रस्ते ग्रामपंचायत काळात तयार झाले आहेत. त्यांचे थोडेफार रुंदीकरण झाले असले तरी वाढत्या शहरीकरणात हे रस्ते फारच अपुरे पडू लागले आहेत. भाईंदर पश्चिम भागातील रेल्वे स्थानक ते भाईंदर पोलीस ठाणे या मुख्य रस्त्याला अन्य पर्यायी रस्ताच नाही. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळच्या वेळी या ठिकाणी अभूतपूर्व अशी वाहतूक कोंडी होत असते. त्यातच अनधिकृत फेरीवाले या रस्त्यावर पथारी पसरतात. या रस्त्यावर वाहने उभी करण्यासाठी सम आणि विषम तारखा निश्चित करून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार नियम न पाळणाऱ्या दुचाकींवर कारवाई होत, परंतु चारचाकी तसेच अवजड वाहनांवर मात्र कारवाई होत नाही. रस्त्याच्या दुतर्फा ही वाहने उभी राहात असल्याने वाहतूककोंडीत आणखी भर पडते. भाईंदर पूर्व भागातील बाळाराम पाटीलमार्ग (बी. पी. रोड) आणि नवघर रस्ता या दोन्ही मुख्य रस्त्यांची हीच स्थिती आहे. या ठिकाणी असलेल्या औद्योगिक वसाहतींसाठी मालाची वाहतूक करणारी अवजड वाहने, महापालिका आणी बेस्टच्या बस,  बेशिस्त रिक्षाचालक  आणि त्यात भर म्हणून फेरीवाले त्यामुळे या ठिकाणची वाहतूक व्यवस्थाही कोलमडत असते. मीरा रोडच्या शांतीनगर सेक्टर-१ आणि २ मध्यही हेच चित्र आहे.

शहरातील फेरीवाल्यांची संख्या वाढतच चालली आहे. नव्याने विकसित होत असलेले शहराचे नवे परिसर तसेच रस्ता रुंदीकरण झालेले नाके फेरीवाल्यांनी व्यापू लागले आहेत. त्यांची संख्या वाढविणाऱ्यांसाठी फेरीवाला माफिया सक्रिय झाले आहेत. महापालिकेने नेमलेले बाजार शुल्क वसुली करणारे कंत्राटदारच बेकायदा फेरीवाल्याांच बस्तान बसवून देत आहेत. माफियांचा त्यांना आशीर्वाद असल्याने पालिकेचे पथकही त्यांना हात लावत नाहीत, असा खुला आरोप खुद्द लोकप्रतिनिधीच करत आहेत.

यात सामान्य नागरिक मात्र भरडला जात आहे. फेरीवाले आणि वाहतूककोंडी या चक्रात नागरिकांना रस्त्यावरून आणि पदपथावरून चालणेच अशक्य झाले आहे. नागरिकांच्या मनातील ही सल ओळखून लोकसत्तातर्फे ‘वाहतूककोंडी आणि अनधिकृत फेरीवाले’ या विषयावर लाऊडस्पीकर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात नागरिकांना समस्या प्रशासनापुढे मांडण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

कधी?

शनिवार, १७ ऑगस्ट २०१९

वेळ : सायं. ६ वाजता

कुठे ?

नगरभवन सभागृह, भाईंदर (पश्चिम )