माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाचा अजब कारभार

निखील मेस्त्री, पालघर

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून अलीकडे झालेल्या दहावी परीक्षेतील उत्तीर्ण व अनुत्तीर्ण झालेल्या  विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका जिल्ह्यातील शाळांना प्राप्त झाल्या आहेत. मात्र अनेक विद्यार्थ्यांना गुणपत्रिका बोर्डाने पाठवल्या नसल्याने त्यांना पुढील प्रवेशासाठी समस्या निर्माण होत आहेत. या गुणपत्रिका गेल्या कुठे असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. वाशी परीक्षा मंडळाने पाठवलेल्या गुणपत्रिकेच्या यादीवर सर्वच्या सर्व विद्यर्थ्यांंची नावे असली तरी प्रत्यक्षात मात्र या यादीतील काही विद्यर्थ्यांंच्या गुणपत्रिका गायब असल्याचे कळते. शुRवारी मंडळामार्फत या गुणपत्रिका येथील शाळांना प्राप्त झाल्या आहेत.

पालघर तालुक्यातील केळवे आदर्श विद्यालय, विद्या वैभव विद्यालय, स .त्तू .कदम विद्यालय आदी अनेक विद्यलयांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका वाशी बोर्डामार्फत पाठवण्यात आलेल्या नाहीत. याच प्रमाणे जिल्हाभर शाळांमध्ये काही विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका मिळाल्या नाहीत. विद्यार्थ्यांना  महाविद्यलयीन प्रवेशासाठी ही गुणपत्रिका महत्त्वाची ठरते. अशावेळी काही विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका उपलब्ध नसल्याने महाविद्यालयीन प्रवेश घेणार कसा असा प्रश्न त्यांच्या पालकांना पडला आहे.

याउलट या गुणपत्रकेसाठी आता वाशी मंडळाकडे शाळांना पाठपुरावा करावा लागेल. त्यानंतरच या गुणपत्रिका प्राप्त होतील. मात्र असे असताना माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळामार्फत असे का करण्यात आले याचा खुलासा वा तशा सूचना कोणत्याही शाळेत प्राप्त झालेल्या नाहीत. याउलट सर्व शाळेतील मुख्याध्यापकांना याबाबत कळविल्याचे मंडळाचे म्हणणे आहे. तसेच या गुणपत्रिका खराब असल्याचे कारण वाशी मंडळ पुढे देत आहे. विद्यार्थ्यांच्या या गुणपत्रिका वेळेत न मिळाल्यास प्रवेशापासून ते वंचित राहण्याची चिन्हे आहेत. शाळांची चूक  झाल्यास ती सशुल्क दुरुस्त करावी लागते. मात्र मंडळ चुकल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

मुंबई मंडळांतर्गतच्या १४०० गुणपत्रिका खराब असल्याकारणाने त्या फेरछपाईसाठी पाठविण्यात आल्या आहेत. त्या पुणे येथे पाठविण्यात आल्या असून छपाईनंतर त्या शाळांना वितरित करण्यात येतील. याबाबत शाळांच्या मुख्याध्यापकांना कळविण्यात आले आहे.

-शरद खंडागळे, सचिव माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ वाशी