युती सरकारला ऊस आणि साखर उद्योगातील काही कळणार नाही, अशी टीका केली जात होती. पण गेल्या पाच वर्षात उसाला सर्वाधिक दर देऊन शेतकऱ्यांचे समाधान याच सरकारने केले आहे. साखरेचा विक्री दर निश्चित करून साखर उद्योगाला दिलासा दिला आहे. याचमुळे एफआरपीवरून होणारे आंदोलन आता बंद झाले आहे,असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विरोधकांना लगावला.

कागल येथे शाहू सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्याचा अनावरण समारंभ आज पार पडला. यानिमित्ताने म्हाडा (पुणे) चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचा उमेदवार म्हणून केलेले शक्तिप्रदर्शन लक्षवेधी ठरले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते, श्रीमंत छ. शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पुतळ्याचा अनावरण सोहळा आणि शेतकरी मेळावा संपन्न झाला. यावेळी फडणवीस यांनी राजर्षी शाहू महाराज आणि राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला. संजय मंडलिक, धैर्यशील माने, संभाजीराजे छत्रपती व आण्णासाहेब जोल्ले या खासदारांचा सत्कार फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.

शेती प्रश्नावरून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडणाऱ्या विरोधकांचा समाचार घेतानाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी शासनाच्या गुणात्मक कामगिरीचा आढावा घेऊन उपस्थित शेतकऱ्यांना आश्वस्त केले.फडणवीस म्हणाले, केंद्र व राज्य सरकारने शेती, शेतकऱ्यांसाठी मोलाचे काम केले आहे. ऊस- साखर उद्योगाला दिलासा देण्याचे काम केले आहे. या उद्योगाचे प्रश्न आम्हाला कळणार नाहीत असे विरोधक म्हणत होते. पण आम्हीच या उद्योगाचे प्रश्न मार्गी लावली आहेत. उसाची एफआरपी खात्रीने मिळत राहिल्याने शेतकऱ्यावर आंदोलन करण्याची वेळ आली नाही . ९५ टक्के पेक्षा जास्त एफआरपी दिली आहे, उर्वरीतही लवकर मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्र्यांचा मुश्रिफांवर निशाणा
कागलचे राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांचे ‘पर्मनंट आमदार’ असे फलक लागले आहेत. यावर फडणवीस यांनी महाभारतातील धर्मराज युधिष्ठीर यांच्या ‘व्यक्तीच्या जीवनात कायमचे असे काही नसते’ या म्हणण्याचा संदर्भ देऊन आमदार मुश्रीफ यांच्यावर निशाण साधला. ‘पर्मनंट ‘ असे काहीच नसते. जनता पाच वर्षेसाठी निवडून देते. पण काहीजण स्वतःला अमरत्व प्राप्त झाल्यासारखे वागतात. राजकारणात रस्ता भरकटत गेलेल्या भल्याभल्याना जनतेने घरी बसवले आहे, असा टोला त्यांनी लगावला.