राज्यावर कर्जाचा डोंगर असताना मी मुख्यमंत्री बोलतोय, दिलखुलास या कार्यक्रमांवर वर्षाला कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी होत असल्याचे समोर आले आहे. जय महाराष्ट्र/ दिलखुलास आणि मी मुख्यमंत्री बोलतोय या कार्यक्रमावर वर्षाला ४ कोटी ४५ लाख रुपये खर्च होणार असून या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल टाकत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील मी मुख्यमंत्री बोलतोय, दिलखुलास आणि जय महाराष्ट्र हे कार्यक्रम सुरु केले आहेत. जनतेशी संवाद साधण्यासाठी तसेच सरकारी योजनेची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हे कार्यक्रम सुरु करण्यात आले. महिन्यातून दोन वेळा आणि वर्षातून २४ वेळा हे कार्यक्रम प्रसारित करण्यात येतील. एप्रिल महिन्यापासून हे कार्यक्रम सह्यादी वाहिनीवर सुरुदेखील झाले आहेत. या कार्यक्रमाच्या एका भागासाठी २७ लाख ९ हजार ४०० रुपये ऐवढा खर्च होतो. यामध्ये शुटिंग करणे, चित्रीकरणाचे क्रोमा, मॉन्टेज म्युझिक, एडिटिंग, मेकअप मन, फ्लोअर मॅनेजर, पुन :प्रसारणाचा खर्च, वृत्तपत्रांमधील जाहिराती याचा समावेश आहे. यानुसार या कार्यक्रमांसाठी वर्षाला ४ कोटी ४५ लाख १२ हजार ८०० रुपये इतका खर्च होणार आहे.

राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने हा प्रस्ताव अर्थ विभागाकडे पाठवला होता. याला अर्थविभागाने मंजुरी दिली असून ५ ऑक्टोबररोजी या खर्चाला मंजुरी दिल्याचे परिपत्रकही जारी करण्यात आले आहे.  राज्यावर सुमारे चार लाख कोटी रुपयांचे कर्ज असून शेतकरी कर्जमाफीमुळे तिजोरीवरील भार वाढला आहे. राज्यातील आर्थिक स्थिती फारशी चांगली नसताना कार्यक्रमांवर ऐवढा खर्च करणे योग्य आहे का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीदेखील या खर्चावर प्रश्न उपस्थित केले आहेत.