अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी बलात्कार प्रकरणातील पीडित कुटुंबियांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी भेट घेतली. अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांच्यासह त्यांनी दहा ते पंधरा मिनिटे पीडित कुटूंबीयांशी चर्चा केली. आरोपींना फासावर लटकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी गावकऱ्यांना दिले आहे. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री रामदास आठवले यांना कोपर्डीला जाण्यापासून रोखले होते. सध्या कोपर्डीमधील वातावरण तापले असून तुम्ही तिथे गेलात तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे देखील त्यांना सांगण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांच्या फोनमुळे रामदास आठवले यांना विमानतळावरून परतावे लागले होते.
अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीपर्यंत पोहोचवू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात दिले होते. याप्रकरणात पोलिसांनी दिरंगाई केल्याचा आरोप झाला. मात्र, तो संपूर्णपणे चुकीचा असल्याचा दावा देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला होता. कोपर्डीतील घटनेनंतर पीडितेच्या कुटूंबाला भेट न दिल्यामुळे विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. यावर प्रतिउत्तर देताना घटना घडली त्यावेळी मी रशियाला होतो. त्यानंतर पंढरपूर आणि दिल्लीत बैठकीला होतो. त्यामुळे मला नगरला जाता आले नाही, असे फडणवीसांनी सांगितले होते. दरम्यान, याप्रकरणाची चौकशी सीआयडीमार्फत करण्याचीही सरकारची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
संग्रहित लेख, दिनांक 24th Jul 2016 रोजी प्रकाशित
मुख्यमंत्र्यांनी केले कोपर्डीतील पीडित कुटुंबीयांचे सांत्वन
कोपर्डी बलात्कार प्रकरणातील पीडित कुटुंबियांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी कोपर्डीकडे रवाना झाले आहेत.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 24-07-2016 at 16:37 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm devendra fadnavis visit kopardi today