विश्वास पवार, वाई

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नायगाव (ता. खंडाळा) येथे दिलेल्या भेटीत राज्यातील इतर मागासवर्गीय समाजातील माळी समाजाला गोंजारण्याचा प्रयत्न केला. मराठा आरक्षणाच्या पाश्र्वभूमीवर माळी तसेच इतर ओबीसींना जवळ करून सामाजिक समीकरण साधण्यावर भर देण्यात आला.

नायगाव (ता. खंडाळा) येथे सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १८८ व्या जयंती सोहळ्याचे आयोजन केले. मुख्यमंत्र्यांना नायगावला पोहचण्यास उशीर झाल्याचा फायदा उठवत राष्ट्रवादी काँग्रेसने या कार्यक्रमावर प्रभाव ठेवण्याचा प्रयत्न केला. स्थानिक पातळीवरील सत्तास्थाने त्यांच्या ताब्यात आहेत. या कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने माळी व बहुजन समाज एकत्र येतो याचा पुरेपूर फायदा उठविण्याचा प्रयत्न  मुख्यमंत्र्यांनी केला. महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी समाजातील वंचितांपर्यंत विकास आणि महिलांपर्यंत शिक्षण पोहोचविण्याचे काम यशस्वीपणे केले.  राज्यात देशात फुलेंचा विचार आत्मसात केल्याशिवाय पुरोगामित्व प्रत्यक्षात येणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. फुले दाम्पत्याला भारतरत्न देण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्ताव पाठविला असून राज्य सरकार याविषयी केंद्राकडे पाठपुरावा करणार आहे. संत सावता माळी यांचे जन्मगाव अरणचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार केला असून तेही काम वेगाने मार्गी लावणार असल्याचे स्पष्ट केले. महिलांच्या मुक्तीसाठी आयुष्य घालवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असणाऱ्या नायगावला ‘ब ‘दर्जाचे तीर्थक्षेत्र घोषित करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी तात्काळ प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना करून मुख्यमंत्री म्हणाले, नायगावमध्ये ‘सावित्रीसृष्टी’ उभारणीसाठी मान्यता देऊ, तसेच पुणे शहरातील ज्या भिडे वाडय़ात पहिली मुलींची शाळा सुरू झाली, त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक उभारणीचा प्रश्न कायदेशीर कचाटय़ात अडकला आहे. मात्र सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून स्मारक उभे करण्याचे काम सरकार करणार असल्याचे सांगितले. तसेच राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मुली व महिलांसाठी शिक्षण क्षमता लवकरच वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगतले.

राष्ट्रवादी काँग्रेसचाही कार्यक्रम

मुख्यमंत्र्यांना कार्यक्रमाला येण्यास उशीर झाला, यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने कार्यक्रम उरकून घेतला. कार्यक्रमात छगन भुजबळांच्या भाषणावेळी त्यांचा जयघोष सुरू होता. भुजबळांचे भाषण संपताच मोठय़ा संख्येने मंडप मोकळा झाला. सूत्रसंचालकांना मुख्यमंत्री आले आहेत थोडे थांबा, बसून राहा, उठून जाऊ  नका, असे वारंवार सांगावे लागले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm devendra fadnavis visit naigaon on savitribai phule birthday
First published on: 05-01-2019 at 00:33 IST