त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्तात कुंभपर्वातील तिसरे आणि अखेरचे शाहीस्नानास आज पहाटे सुरुवात झाली. या शाहीस्नानात साधू-संतापेक्षा भाविकांची गर्दी पाहावयास मिळत आहे. पर्वणीच्या पूर्वसंध्येलाच सुमारे तीन लाख भाविक येथे दाखल झाले होते. शाही मिरवणूकीस सुरुवात होण्यापूर्वी भाविकांनी रांगोळ्या काढून साधूसंतांचे स्वागत केले.
तब्बल १२ वर्षांनी आलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या या पर्वाचा अध्याय  पिंपळद येथील आखाड्यातून पहाटे ०३:४० वाजता प्रथम जुन्या आखाड्याची मिरवणूकीस सुरुवात झाली. आत्ताप्रर्यंत जूना दशनाम, निरंजनी, आनंद, अग्नी, जुना, आवाहन, निर्मोही, महानिर्वाण आणि अटल आखाड्याचे शाही स्नान झाले असून निर्वाणी व बडा उदासीन आखाडा यांचे शाही स्नान सुरु आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये कुशावर्त तीर्थावर साधू-महंतांचे स्नान होणार असून, दुपारी १२ नंतर भाविकांना येथे स्नान करता येईल.
दरम्यान, पाहटेच मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस हे त्र्यंबकेश्वरमध्ये कुशवर्त येथे पोहचले. यावेळी, त्यांच्यासोबत विजय भटकर, गिरीश महाजन, सुधींद्र कुलकर्णी उपस्थित होते. कैलास मान सरोवरतील तीर्थ मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकच्या कुशवर्तत जलार्पण केले गेले. कैलास मानसरोवरचे तीर्थ कुशावर्त गोदावरीत समर्पित करण्यात आले आहे. यामुळे दोन संस्कृतींचे मिलन झाले असून हा सिंहस्थ आता आंतरराष्ट्रीय कुंभ झाल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.