मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने पालकत्व स्वीकारलेल्या सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे येथील स्मारकाचा गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या लोकार्पण सोहळ्याकडे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पाठ फिरविली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पार पडलेल्या या सोहळयास काँग्रेसचे वनमंत्री डॉ. पतंगराव कदम वगळता अन्य कोणीही काँग्रेसचे नेते उपस्थित नव्हते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुसंख्य नेते या कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित होते.
देवराष्ट्रे येथील यशवंतराव चव्हाणांच्या जन्म घराचे स्मारक करण्यासाठी पुरातत्त्व विभागातर्फे महाराष्ट्र वैभव राज्य संरक्षित स्मारक संगोपन योजनेअंतर्गत विकास करण्यात आला आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला या स्मारकाचे पाच वर्षांसाठी पालकत्व देण्यात आले आहे. तथापि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानकडे हे स्मारक हस्तांतरित करीत असताना आपणास कोणीतीही कल्पना दिली नसल्याचा आरोप वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी चार दिवसांपूर्वी कडेपूर येथे केला होता. या शिवाय देवराष्ट्रे गावच्या विकासासाठी खर्च करण्यात आलेल्या निधीतून निकृष्ट दर्जाची कामे झाल्याचा आरोप करून चौकशीचे आदेशही दिले होते. त्यानुसार सांगलीचे जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी विकासकामाचे थर्ड पार्टी ऑडीट करण्याचे निर्देष गत सप्ताहात दिले आहेत.
या पाश्र्वभूमीवर आजच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना प्रतिष्ठानने निमंत्रित केले होते. मात्र ते आजच्या कार्यक्रमास उपस्थित नव्हते. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत स्मारकाचा लोकार्पन सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री आर.आर.पाटील, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, जलसंपदा मंत्री शशिकांत िशदे, खा. सुप्रिया सुळे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करीत तरुणांना हे कार्य प्रेरणादायी ठरेल असे सांगितले. या व्यतिरिक्त त्यांनी कोणतेही राजकीय वक्तव्य या कार्यक्रमात केले नाही.