पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर आज देशातील सर्वाधिक करोनाबाधित आढळलेल्या १० राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधानांनी १० राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी करोनावर मात करण्यासाठी मार्गदर्शनही केलं. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील पंतप्रधानांशी संवाद साधला. कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही. तसंच यासाठी प्रयत्नशील असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान करोनाच्या महाराष्ट्रातील परिस्थितीबाबत माहिती दिली. “करोनाबाधित आणि मृत्यू झालेली एकही केस लपवली नाही. पारदर्शकपणे माहिती देण्यात आली आहे. करोनाबाबत अनेकांच्या मनात भीती तर अनेकांमध्ये काहीही होत नाही अशी भावना आहे. परंतु पोटासाठी बाहेर पडण्याची गरजदेखील आहे. अशा तीन अवस्थेत कोरोनाचा सामना सुरु असल्याचं त्यांनी पंतप्रधानांना सांगितलं.

दुसरी लाट येऊ देणार नाही

राज्यातील मृत्यू दर कमी करण्याचा प्रयत्न केला जात असून मुंबईतील धारावी, वरळी येथील स्थिती नियंत्रणात आणल्याबद्दल सर्वंत्र कौतुक होत आहे. मात्र अजुनही लढाई संपली नाही. कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही यासाठी प्रयत्नशील असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

आणखी वाचा- अंतिम वर्षाच्या परीक्षांसंबंधी उद्धव ठाकरेंची पुन्हा एकदा नरेंद्र मोदींकडे मागणी, म्हणाले…

पाच रूपयांत शिवभोजन

याकाळात शिवभोजन योजनेच्या माध्यमातून महिन्याला लाखो लोकांना केवळ ५ रुपयांमध्ये जेवणाची सोय केली. राज्यातील गरीब जनतेला याचा मोठा लाभ झाला आहे. मागच्या आठवड्यात कुपोषण निर्मुलनासाठी आदिवासी बालकांना व मातांना दुध भूकटी मोफत देण्याचा निर्णयदेखील राज्यशासनाने घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

इतर आजारांसाठी यंत्रणा निर्माण करण्याची गरज

इतर आजारांसाठी यंत्रणा निर्माण करण्याची गरज कोरोनातून बरे होऊन घरी जाणाऱ्या लोकांना इतर आजार झाल्याचे दिसून येत आहे. त्यांच्यावर कोरोनानंतरही उपचार व्हावे यासाठी यंत्रणा निर्माण करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात साथ रोग नियंत्रण रुग्णालय मुंबईसह सर्व जिल्ह्यांमध्ये सुरु करणार असल्याचे ते म्हणाले. इमिनॉलॉजी लॅबची संख्या वाढविण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. विविध प्रकारच्या विषांणुचा उद्भव कसा आणि का होतो यावर संशोधन करण्याची गरज असल्याचंही ठाकरे म्हणाले.

मास्क, सोशल डिस्टंसिंग हेच सध्या औषध

“कोरोनावर अद्याप औषध नाही आणि लस अजून उपलब्ध झालेली नाही. जनजागृती करतांना आज घडीला तरी मास्क, सोशल डिस्टंसिंग हेच औषध आणि लस आहे असे नागरिकांना समजून सांगतलं. अशा पद्धतीने करोनासोबत आपण जगायला शिकलो तर लॉकडाउन नाही तर अनलॉकिंगची प्रक्रिया आणखी सोपी व जलद होईल,” असे मत मुख्यमंत्र्यांनी यावेळी मांडलं. राज्यात करोना उपचारासाठी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि इतर सुविधांसह सज्ज अशा साडेतीन लाख बेड्स उपलब्ध असल्याचे सांगतानाच यासुविधांसाठी डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी यांची गरज असल्याचंही पंतप्रधानांना सांगितलं.