28 January 2021

News Flash

कार्यक्रमांवरील बंदीमुळे व्यावसायिक अडचणीत

कोटय़वधींची उलाढाल ठप्प; रोजगारावर गदा

(संग्रहित छायाचित्र)

प्रबोध देशपांडे

करोनाच्या संकटाने सर्वच क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. आर्थिक अडचणींमुळे विविध व्यवसायांचे अस्तित्व धोक्यात आले आहेत. टाळेबंदीचे निर्बंध शिथिल करताना काही व्यवसायांना परवानगी देण्यात आली. मात्र, गेल्या सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून राज्यात  कार्यक्र मांवर बंदी असल्यामुळे अनेक छोटे-मोठे व्यवसाय डबघाईस आले आहेत. कोटय़वधींची उलाढाल ठप्प झाली असून, रोजगारावर परिणाम झाला आहे.

करोना संकट व टाळेबंदीचा मोठा फटका सर्वच व्यवसायांना बसला. व्यावसायिकांची आर्थिक घडी विस्कटली आहे. सरकारने काही व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. सार्वजनिक स्वरूपाच्या कार्यक्रमांना मात्र अद्यापही परवानगी नाही. त्यामुळे धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, घरगुती व लग्न समारंभ आदी मोठय़ा कार्यक्रमांशी निगडित असलेले १२ ते १५ प्रमुख व्यवसाय आर्थिक अडचणीत आहेत. सहा महिन्यांपासून कार्यक्रम नाहीत. त्यामुळे व्यवसाय ठप्प आहेत. या व्यवसायांवर रोजगार अवलंबून असलेल्या राज्यातील कामगारांच्या उदरनिर्वाहाचादेखील प्रश्न निर्माण झाला आहे.

लग्न समारंभाचा हंगाम साधारणत: उन्हाळय़ात असतो. या काळात दरवर्षी मोठी आर्थिक उलाढाल होते. मंडप, कपडे, सराफ, कॅटरिंग, मंगलकार्य-लॉन, पुरोहित, सजावट, वाद्यवृंद, घोडी-बग्गी, फुलांची सजावट, फोटोग्राफी, लग्नपत्रिका आदी व्यवसायांना चालना मिळते. या माध्यमातून लाखो कामगारांना रोजगार उपलब्ध होतो. या वर्षी मात्र करोनाच्या आपत्तीने सारेच ठप्प आहे. सार्वजनिक स्वरूपाच्या कार्यक्रमांना बंदी होती. त्यानंतरच्या काळात विवाह समारंभांना परवानगी देण्यात आली तरी उपस्थितीची मर्यादा आहे. कमी लोकांच्या उपस्थितीतील लग्न सोहळय़ांचा व्यावसायिकांना कुठलाही लाभ होत नसून मोठय़ा नुकसानीचा सामना करावा लागत असल्याची माहिती अकोल्यातील मंडप व्यावसायिक भैया उजवणे यांनी दिली.

करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सर्वच हतबल झाले आहेत. राज्यात लग्न सोहळे व सार्वजनिक स्वरूपाच्या कार्यक्रमांमध्ये दरवर्षी सुमारे १० हजार कोटींची उलाढाल होते. अकोला जिल्हय़ाचा विचार केल्यास हा आकडा १०० कोटींच्या घरात असल्याची माहिती मंडप व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष दादासाहेब उजवणे यांनी दिली. कार्यक्रमांशी संबंधित असलेल्या प्रमुख व्यवसायांचे जिल्हय़ात सुमारे दोन हजार व्यावसायिक आहेत. या माध्यमातून २५ हजार कामगारांना रोजगार उपलब्ध होतो. या वर्षी करोनामुळे १०० कोटींचा हाच व्यवसाय काही लाखांवर आला आहे. या संकटातून सावरण्यासाठी अकोल्यातील विवाह व कार्यक्रमांशी संबंधित असलेल्या ११ प्रकारच्या व्यावसायिकांच्या प्रमुख संघटनांनी एकत्र येत विवाह सेवा संघर्ष समिती स्थापन केली. या समितीच्या माध्यमातून सरकार व प्रशासनाकडे  परवानगीसाठी पाठपुरावा केला जात आहे.  परिस्थितीत बदल न झाल्यास व्यावसायिक व कामगारांसाठी आगामी काळ अधिक कठीण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

व्यवहारांना खीळ

अनेक वेळा मोठे लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये पैशांची उधळपट्टी होत असल्याची टीका होत असते. मात्र, याच कार्यक्रम व लग्न सोहळय़ांवर अनेक व्यवसाय अवलंबून असतात. त्यातून असंख्य रोजगार उपलब्ध होतात. या माध्यमातून पैसा बाजारपेठेमध्ये येऊन तो खेळता राहतो. सध्या कार्यक्रमबंदी व विवाह सोहळय़ांना मर्यादा असल्याने आर्थिक व्यवहारांना खीळ बसली.

व्यावसायिकांवर कर्जाचा डोंगर

अनेक व्यावसायिकांनी बँकांकडून मोठे कर्ज घेऊन आपले व्यवसाय थाटले. या वर्षी मात्र कार्यक्रम झाले नसल्याने त्यांचे उत्पन्नाचे सर्व मार्ग बंद आहेत. बँकांचे हप्ते कसे फेडावे, हा प्रश्न असून, डोक्यावर कर्जाचा डोंगर तयार झाला. कर्मचाऱ्यांना वेतन व कामगारांना मजुरी देणे अशक्य झाले. त्यामुळे लाखो कामगार बेरोजगार झाले आहेत. हाताला मिळेल ते काम करून अनेक जण कसा तरी आपला उदरनिर्वाह चालवत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 7, 2020 12:15 am

Web Title: commercial difficulties due to ban on events abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 सोयाबीन उत्पादक चिंतेत
2 जव्हारचा हुंबरणे पाडा ‘वाळीत’
3 लहरी हवामानामुळे सुक्या मासळीचे नुकसान
Just Now!
X