दिगंबर शिंदे

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारांची मोठी संख्या आणि चुरस यामुळे मतविभागणी मोठय़ा प्रमाणात होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा मिळवण्यासाठी दुसऱ्या व तिसऱ्या पसंतीच्या मतालाही मोल आले आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघ हा पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सांगली असा पाच जिल्ह्य़ांत विखुरला आहे. मतदारसंघाची ही व्याप्ती, प्रचारासाठी असलेला अल्प वेळ आणि करोनाची धास्ती यामुळे कुठल्याच पक्षाला आणि उमेदवाराला मतदारांची प्रत्यक्ष भेट घेणे यंदा अशक्य आहे. त्यातच महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर तसेच राज्यातील राजकीय स्थित्यंतरानंतरची होणारी ही पहिलीच निवडणूक असल्याने सर्वच पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.

दुसरीकडे, यंदा पुणे पदवीधर मतदारसंघात तब्बल ६२ उमेदवार उभे आहेत. निवडणुकीतील चुरस आणि उमेदवारांची मोठी संख्या यामुळे मतविभागणी होण्याची चिन्हे आहेत. यामुळे विजयासाठी आवश्यक मतांचा आवश्यक कोटा गाठण्यासाठी कसोटी लागणार असल्याचे उघड झाले आहे. यासाठी अनेक फेऱ्यांपर्यंत ही प्रक्रिया लांबणार आहे. यामुळे या निवडणुकीत यंदा कधी नव्हे ते दुसऱ्या व तिसऱ्या पसंतीच्या मतालाही मोल आले आहे.

निवडपद्धत अशी.. : सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्वाधिक मते मिळवणारा उमेदवार विजयी घोषित केला जातो. अगदी एका मतानेही निकाल लागतो. मात्र पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी निराळी पद्धत आहे. इथे झालेल्या मतदानापैकी ५१ टक्के मतांचा कोटा हा विजयासाठी निश्चित केला जातो. आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्या फेरीत एकही उमेदवार विजयी झाला नसल्याचे अ‍ॅड. अमित शिंदे यांनी सांगितले.