१३३ कंत्राटदारांचे कोट्यवधी रुपये थकवल्याचे प्रकरण

चंद्रपूर : वरोरा येथील औद्योगिक वसाहत परिसरातील साई वर्धा पॉवर वीजनिर्मिती कंपनीला दिवाळखोरीत काढून ६ हजार २०७ कोटी रुपयांचा महाघोटाळा करणाऱ्या तत्कालीन मालक किशोर सेथुरमन विरुद्ध जय लहरी इंटरप्राइजेस कंपनीच्या संचालकाने मंगळवारी वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सेथुरमन यांच्याविरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याने कंपनी व्यवस्थापन मंडळात खळबळ उडाली आहे.

वरोरा औद्योगिक वसाहत परिसरात हैदराबाद येथील केएसके एनर्जी वेंचर्स यांच्या मालकीची साई वर्धा पावर विद्युत निर्मिती कंपनी २०१०-११ मध्ये सुरू केली. या कंपनीच्या क्षमतेपेक्षा तिप्पट कर्ज बँकाकडून दिले गेले. या कर्जासह कंपनीने १३३ कंत्राटदार आणि पुवठादारांचे १८४४.६९ कोटी रुपये आणि महावितरण व महाट्रान्सकोचे ६४१.६७ कोटी रुपये, वेकोलिचे ७५३.५३ कोटी रुपये तथा इतर सरकारी कंपन्याचे १९८.३२ कोटी रुपये असे मिळून एकूण ६ हजार ८४८ कोटी ८५ लाख रुपये थकवले आहेत. षडयंत्र रचून बँक अधिकारी, महावितरण आणि प्रवर्तक यांनी संगनमताने कंपनी दिवाळखोरीत काढली. परिणामी ६ हजार ८४८.८५ कोटी थकबाकी तसेच १ हजार ५२९.३० कोटी रुपयांचे बाजारमूल्य असलेली साई वर्धा पावर कंपनी केवळ ६४१ कोटी रुपयात जुन्या मालकाचा स्वीय सहायक व नवीन कंपनीचा सीईओ असलेल्या व्यक्तीच्या कंपनीला विकली गेली. या प्रक्रियेत ६ हजार २०७ कोटी रुपयांपेक्षा अधिकचा घोटाळ्याचा आरोप आहे. यामध्ये १३३ कंत्राटदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. अनेकांचे व्यवसाय बुडाले. काही कर्जबाजारी कंत्राटदार आर्थिक डबघाईस आले आहे. यापैकी जय लहरी इंटरप्राइजेस या कंत्राटदार कंपनीचे संचालक मुकेश जीवतोडे यांनी कंपनीचे तत्कालीन मालक किशोर सेथुरमन यांच्याविरुद्ध वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार देऊन आर्थिक फसवणूक केली असल्याचा आरोप केला. तसेच गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. सदर कंत्राटदाराकडे कंपनीचा कामगार पुरवठ्याचे कंत्राट होते. याचे २०१७ पासूनची देयके कंपनीने जाणीवपूर्वक थकीत ठेवली. २०१९ मध्ये कंपनी दिवाळखोरीत काढून या कंत्राटदाराच्या ७२ लाख ४१ हजार ८२१ रुपयांच्या देयकासह इतर स्थानिक कंत्राटदारांची मिळून १९ कोटी ३२ लाखांची देयके दिली नाही. सदर देयके दिवाळखोरी मध्ये निघण्याच्या दोन वर्षा पूर्वीची होती. कंपनी मालकाने अधिकाऱ्यांना हाताशी धरून कंपनी दिवाळखोरीत काढण्याचे नियोजन केले व कंत्राटदारांचे देयक थकवण्यात आले. यामुळे साई वर्धा पॉवर कंपनीच्या संपूर्ण व्यवहाराची चौकशी झाल्यास मोठा घोटाळा बाहेर येऊ शकतो, असे म्हटले जाते.

जय लहरी इंटरप्राइजेसचे संचालक मुकेश जीवतोडे यांची तक्रार मिळाली आहे. मागील सहा महिन्यांपासून स्थानिक कंत्राटदार व वर्धा पॉवर कंपनी यात थकीत बिलाच्या पैशावरून वाद सुरू आहे. या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्यात येईल. -डॉ.नीलेश पांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा