पुण्याच्या नाथा शिंगाडे, जळगावचे विजय पवार, ज्येष्ठ पत्रकार प्रशांत पवार आणि दापोली येथील लोकमान्य टिळक विद्यामंदिर शिक्षण संस्थेची येथील कॉम्रेड नरेंद्र (नाना) मालुसरे चॅरिटेबल संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या दीपस्तंभ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. येथील परशुराम साईखेडकर नाटय़गृहात १२ जानेवारी रोजी पुरस्कार प्रदान सोहळा होणार असल्याची माहिती संस्थेच्या वतीने अनुराधा मालुसरे यांनी  दिली.
सोमवारी साडेतीन वाजता होणाऱ्या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिध्द लेखक अच्युत गोडबोले तर अध्यक्ष म्हणून आ. जीवा पांडु गावित उपस्थित राहणार आहेत. वैयक्तीक ११ हजार रूपये, शाल, स्मृतीचिन्ह व मानपत्र, पुस्तक तसेच संस्थेसाठी २५ हजार रुपये, शाल, स्मृतीचिन्ह, पुस्तक असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यंदा आदिवासी क्षेत्रातील किसान कार्यकर्ता म्हणून पुण्याच्या घाटघर येथील नाथा शिंगाडे यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांनी जुन्नर, आंबेगाव या तालुक्यातील दोन हजार दारिद्रय रेषेखालील लोकांना शिधापत्रिका मिळवून दिल्या. शाळा चालकांकडून स्वीकारण्यात येणाऱ्या देणगी विरोधात त्यांनी संघर्ष केला. जळगाव जिल्हा बांधकाम कामगार संघटनेच्या माध्यमातून असंघटीत कामगारांसाठी लढा देणारे विजय पवार यांना आदर्श कामगार पुरस्कार देण्यात येणार आहे.
आदर्श शिक्षण संस्था पुरस्कारासाठी रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातील लोकमान्य टिळक विद्यामंदिरची निवड करण्यात आली आहे. प्राचार्य रेणू दांडेकर यांना राजाराम दांडेकर यांची चांगली साथ मिळत आहे.