08 March 2021

News Flash

‘आदर्श शिक्षक’ निवडीचा सावळा गोंधळ

राज्यभरातील शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी

राज्यभरातील शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी

आदर्श शिक्षक पुरस्कार निवडीच्या सावळ्या गोंधळामुळे शिक्षकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, पुण्याच्या महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेत १९, २० व २१ ऑगस्टला रात्री उशिरा ९ वाजेपर्यंत मुलाखती घेण्यात आल्याने राज्यभरातील शिक्षकांची मोठीच धावपळ झाली.

यंदाच्या राज्य शिक्षक पुरस्कारासाठी राज्य शासनाने दोनदा निकषांमध्ये बदल केला. २०१५-१६ साठीच्या पुरस्कारांसाठीचे प्रस्ताव डिसेंबर २०१५ मध्येच कागदपत्रांसह ७० ते १०० पानांचे बाईंडिंग करून शिक्षण विभागाकडे जमा झाले होते, परंतु शिक्षण विभागाने सुधारित ३० निकष जाहीर करून ५ ऑगस्टपर्यंत राज्यभरातील शिक्षकांकडून नव्याने ऑनलाइन प्रस्ताव मागितले. त्यामुळे शिक्षक चांगलेच संतापलेले असतांनाच ऑनलाइन प्रक्रियेतून प्रस्ताव मागितल्यावर या पुरस्कारांसाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेत १९ ऑगस्टला नाशिक, कोल्हापूर, लातूर विभाग, २० ऑगस्टला औरंगाबाद, अमरावती, नागपूर विभाग आणि २१ ऑगस्टला पुणे, मुंबई विभागातील आमंत्रित प्राथमिक, माध्यमिक, आदिवासी, प्राथमिक शिक्षक व सावित्रीबाई फुले शिक्षिका, कला व क्रीडाशिक्षक आणि अपंग, स्काऊट व गाईड शिक्षकांना मुलाखतीसाठी बोलविण्यात आले. विशेष म्हणजे या मुलाखतींसाठी ११ ऑगस्टला पत्र पाठविण्यात आले असले तरी बहुतांश लोकांना मुलाखतीच्या एक दोन दिवस अगोदर, अनेकांना १७, काहींना १८, तर अनेकांना १९ ऑगस्टला हे मुलाखतीचे निरोप देण्यात आले. त्यामुळे अनेक शिक्षक धावपळ करून मिळेल त्या गाडीने पुण्यात पोहोचले. नागपूर विभागातून ३६ शिक्षकांना  बोलाविण्यात आले होते. याच आकडावारीनुसार सर्वच विभागातील किमान ३६ शिक्षक म्हणजेच, एका दिवसाला १०० शिक्षकांच्या मुलाखती घेण्यात आल्या.

सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या या मुलाखती रात्री ८ ते ९ पर्यंत सुरू होत्या. तेथे आलेल्या शिक्षकांसाठी चहापानाची, जेवणाचीच काय कुठलीच व्यवस्था करण्यात आलेली नव्हती, त्यामुळे शिक्षकांचे हाल झाले. या निवड प्रक्रियेमुळे शिक्षकांची मोठीच धावपळ झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

निवड प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह

केवळ नागपूर विभागातील शिक्षकांचीच नाही, तर सर्वच विभागातील शिक्षकांची दयनीय अवस्था तेथे होती. आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी ज्यांची निवड करायची त्यांच्या अशा केविलवाण्या अवस्थेमुळे अनेकांनी या निवड प्रक्रियेवरच आक्षेप नोंदविला आहे. आदर्श शिक्षक निवडायचेच होते, तर विभागवार मुलाखती घेणे योग्य होते, पुण्यात बोलावून मुलाखती घेण्याची काय गरज होती, असाही प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. विशेष म्हणजे, यापूर्वी स्वातंत्र्यदिनीच या पुरस्कारांची घोषणा होत होती. मात्र, यंदा ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन तोंडावर आलेला असतानाही राज्य शासन आदर्श शिक्षक निवडू शकले नाहीत, त्यामुळे या निवड प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2016 1:27 am

Web Title: confusion in ideal teacher selection
Next Stories
1 साताऱ्यातील झेंडू उत्पादक अडचणीत
2 रोजगार हमी योजनेकडे कामगारांची पाठ
3 रायगड जिल्ह्यत डेंग्यू बळावला
Just Now!
X