आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. निवडणुकीसाठी काँग्रेसने महाराष्ट्रातील विविध समित्या जाहीर केल्या आहेत. माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे राज्यातील दिग्गज नेते सुशीलकुमार शिंदे यांची प्रचार समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना जाहीरनामा समितीचे प्रमुख बनवण्यात आले आहे. खासदार कुमार केतकर यांच्याकडे माध्यम समितीची धुरा सोपवली आहे. प्रसिद्धीची जबाबदारी रत्नाकर महाजन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. लोकसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे यांना समन्वय समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे.

महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत. २०१४ लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फक्त दोन जागा जिंकता आल्या होत्या. भाजपा-शिवसेना युतीने तब्बल ४१ जागांवर विजय मिळवला होता. २०१९ लोकसभा निवडणुकीत हे चित्र बदलण्यासाठी काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरु आहे. पक्षांतर्गत गटबाजीचा फटका बसू नये तसेच काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी एकदिलाने निवडणुकीला सामोरे जावे यासाठी जास्तीत जास्त नेत्यांना वेगवेगळया समित्यांमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न आहे.

आजच काँग्रेसने प्रियंका गांधी यांची पक्षात महासचिवपदी नियुक्ती केली. गेल्या काही वर्षांपासून पक्षातील कार्यकर्ते प्रियंका गांधी यांनी सक्रीय राजकारणात यावे, अशी मागणी करत होते. आता प्रियंका गांधी यांना औपचारिकरित्या पक्षात पद दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

प्रियंका गांधी या निवडणुकीत राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या प्रचार करायच्या. मात्र, त्यांच्याकडे पक्षात कोणतेही पद नव्हते. गेल्या काही वर्षांपासून प्रियंका गांधी यांच्याकडे पक्षाची धूरा सोपवण्याची मागणी केली जात होती. ‘प्रियंका लाओ, काँग्रेस बचाओ’, असे पोस्टरही काँग्रेस कार्यकर्त्यांनी लावले होते.

सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून या पार्श्वभूमीवर काँग्रेसने प्रियंका गांधी यांना पक्षात पद दिले आहे. प्रियंका गांधी यांची पूर्व उत्तर प्रदेशच्या महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली असून फेब्रुवारीपासून त्या पदभार स्वीकारतील.