राज्यात सध्या नामांतराचा विषय गाजत असून त्यावरुन बरीच चर्चा रंगली आहे. एकीकडे औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर व्हावं अशी मागणी होत असताना काँग्रेसचा मात्र त्याला विरोध आहे. शिवसेना गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी करत आहे. मात्र हा किमान समान कार्यक्रमाचा भाग नसल्याची आठवण काँग्रेस करुन देत आहे. दुसरीकडे भाजपा शिवसेना आणि काँग्रेस नाटक कंपनी असल्याची टीका करत आहे. त्यातच आता काँग्रेस प्रदेसाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नामांतराला विरोध असल्याचं म्हटलं आहे.

बाळासाहेब थोरात यांनी ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते, भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे”.

आणखी वाचा- औरंगाबादचं संभीजानगर व्हावं का? अजित पवारांनी मांडलं स्पष्ट मत; म्हणाले…

बाळासाहेब थोरात यांनी यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कारभारावर नाराजी जाहीर केली. ते म्हणाले आहेत की, “माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (@MahaDGIPR) शहरांचे परस्पर नामांतरण करू नये. सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचे भान बाळगावे. शहरांचे नामांतरण करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही”.

आणखी वाचा- संभाजी महाराजांबद्दल अ‍ॅलर्जी असेल, तर दुसरं नाव सांगा; चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीला सवाल

“छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या नावाचा वापर करून नामांतराचे राजकारण खेळू नये, आपण सर्व मिळून औरंगाबादच्या विकासासाठी काम करूया,” असंही ते म्हणाले आहेत.