वेध विधानसभेचा

तुकाराम झाडे, हिंगोली</strong>

नरेंद्र मोदी लाटेतही २०१४ मध्ये काँग्रेसचे नेते राजीव सातव खासदार म्हणून निवडून आले. मात्र, त्यानंतर काँग्रेसची घसरण सुरू झाली. या काळात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपद आपल्याला मिळू शकते, असा प्रयत्न राजीव सातव यांच्याकडून झाला आणि ते प्रकरण त्यांच्या अंगलट आले. परिणामी काँग्रेस अंतर्गत गटबाजी वाढली. राजीव सातव यांनी लोकसभा निवडणूक लढविली नाही. भाजप-सेनेला बळ मिळत गेले. हेमंत पाटील हिंगोलीचे खासदार झाले. अजूनही त्या पराभवाच्या धक्क्य़ातून काँग्रेस सावरलेली नाही. काँग्रेसचे बडे नेते अशी ओळख असणारे राजीव सातव आता एकाकी पडले आहेत. त्यामुळे हिंगोलीत युतीचे बळ वाढेल, पण युती होईल का हा संभ्रमही कायम आहे.

हिंगोली जिल्ह्य़ात तीन विधानसभा मतदारसंघ आहे. सध्या भाजपाचे तान्हाजी मुटकुळे, शिवसेनेचे जयप्रकाश मुंदडा व काँग्रेसचे डॉ. संतोष टारफे हे तिघे नेतृत्व करीत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-सेनेने जोरदार तयारी सुरू केली आहे. महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने जिल्ह्य़ातील वातावरण ढवळून निघाले आहे. मात्र, काँग्रेसकडून राजीव सातव यांच्या भूमिकेमुळे इच्छुक उमेदवार संभ्रमात आहेत. हिंगोली विधानसभेवर राष्ट्रवादीने हक्क सांगितल्यामुळे उमेदवार कोण, या प्रश्नाचे उत्तर गुलदस्त्यात आहे. यापूर्वी राष्ट्रवादीने दोन वेळा विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढविली होती. त्यात त्यांच्या उमेदवारांना अनामत रक्कमही वाचवता आली नसल्याचा इतिहास आहे. विधान परिषदेचे आमदार रामराव वडकुते यांच्या राजकीय ताकदीवर हिंगोली मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा, असा दावा केला जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हिंगोली नगरपालिकेतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीची उरलीसुरली ताकदही संपल्यात जमा आहे.

वसमतमध्ये भाजपाचे अ‍ॅड. शिवाजीराव जाधव, कळमनुरीत भाजपाचे गजाननराव घुगे, शिवसेनेचे संतोष बांगर निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्यातच कळमनुरी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रीय समाज पक्षाला सोडवून घेऊ, असा दावा मंत्री महादेव जानकर यांनी केला होता. जोपर्यंत जागावाटपाचे निर्णय होत नाही, तोपर्यंत संभ्रमावस्था कायम राहील, असे सांगण्यात येत आहे.

हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे १५ वर्षे नेतृत्व केलेले माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर व माजी खासदार राजीव सातव यांच्यात राजकीय वैर निर्माण झाल्याने राजीव सातव यांच्याकडून गोरेगावकरांची उमेदवारी कापण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. तरीसुद्धा भाऊ पाटील गोरेगावकर निवडणुकीच्या मदानात उतरलीच, असा दावा त्यांचे समर्थक करत आहेत. वेळ आली तर ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवीतल, असे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे नारायण खेडेकर, राष्ट्रवादीचे अप्पासाहेब देशमुख यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे  विद्यमान आमदार तान्हाजी मुटकुळे यांना त्याचा काही प्रमाणात लाभ होऊ शकतो, असे मत आहे.

कळमनुरी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार डॉ. संतोष टारफे हे मात्र आपल्या उमेदवारीवर निश्चिंत आहेत. काँग्रेसकडून कळमनुरीत इतर कोणी उमेदवारी मागण्याच्या मनस्थितीत आजतरी दिसत नाही. त्यामुळे टारफे यांची उमेदवारी अंतिम मानली जाते. विशेष म्हणजे कळमनुरी मतदारसंघ पूर्वी कम्युनिस्टांचा गड होता. माजी मंत्री रजनीताई सातव यांनी त्याला सुरूंग लावला. त्यानंतर काँग्रेस अंतर्गत गटबाजीमुळे या मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी कै.मारोती शिंदे यांना एक वेळ तर माजी आमदार गजानन घुगे यांना दोन वेळा मिळाली.

राजीव सातव यांची निवडणूक लढण्याची इच्छा होती, पण टारफे हे माघार घेण्यास तयार नसल्याने सातव यांचाही नाईलाज झाला आहे.

जिल्ह्यातील अतिमहत्वाचा मानल्या जाणाऱ्या वसमत विधानसभा मतदारसंघात विधानसभेच्या निवडणूक निमित्ताने भाजपा-सेना युतीतील मार्ग कठीणच आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा यांची उमेदवारी निश्चित असल्याचे समजून ते कामाला लागले. परंतु लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाचे अ‍ॅड. शिवाजी जाधव यांनी दाखल केलेली उमेदवारी काही अटींवर व तेही राज्याचे मंत्री अर्जुन खोतकर यांच्या मध्यस्थीने मागे घेतली होती. त्यामुळे आपली उमेदवारी अंतिम असल्याचे समजून अ‍ॅड. जाधव कामाला लागले आहे. ३० ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा जवळा बाजार येथे आली असता मुख्यमंत्र्यांनी सभेत बोलतांना तुम्हा उपस्थितांच्या मनात काय हे मला कळले. तुम्ही अ‍ॅड. शिवाजीराव जाधवला बळ देणार का, असा प्रश्न उपस्थित करून जमावातून एकमुखाने होकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजीराव, तुम्ही नििश्चत रहा, उपस्थितांच्या मनातले उमेदवार तुम्हीच असा शब्द दिल्याने अ‍ॅड. जाधव यांचे बळ वाढले तेव्हा डॉ. मुंदडा की अ‍ॅड. जाधव मदानात राहणार हे भाजपा-सेना युती होणार की नाही यावरच ठरणार असल्याचे चित्र आहे. तर राष्ट्रवादीकडून राजेश नवघरे हेसुद्धा इच्छुक उमेदवार आहेत. परंतु माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर काय निर्णय घेतात यावरच नवघरेंच्या उमेदवारीचे भवितव्य ठरणार आहे.

गेल्या ७० वर्षांंत काँग्रेस सरकारने जे केले नाही, ते भाजप सरकारने अवघ्या पाच वषार्ंत करून दाखविले. विकासाचे काम आता मतदारांनाही दिसू लागले आहे. हिंगोलीच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लावला. कोटय़वधी रुपये खर्च करून रस्त्यांची कामे सुरू आहेत. हिंगोलीसारख्या शहराला कोटय़वधी निधी देण्यात आला. अनेक ठिकाणचे पाणीप्रश्न मार्गी लावले.  विकासकामे हे भाजपच्या यशाचे गमक ठरणार आहेत.

– तान्हाजी मुटकुळे, आमदार, भाजप 

भाजप-सेनेने केवळ पोकळ घोषणाबाजी करत विकासाचे गाजर मतदारांना दाखविले. प्रत्यक्षात कोणत्याच आश्वासनांची पूर्तता केली नाही. आजही कर्जमाफीवर मुख्यमंत्री म्हणतात, ‘पात्र शेतकऱ्यांना दिली जाणारी कर्जमाफी योजना  सुरू आहे. अखेरच्या पात्र शेतकऱ्यापर्यंत या योजनेचा लाभ मिळेल’. तीन वर्षे लोटले तरी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ कधी?  हेच सरकारचे अपयश असल्याने मतदारराजा निश्चितच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला विजयी करेल.

– डॉ. संतोष टारफे, आमदार, काँग्रेस.

पक्षीय बलाबल

हिंगोली-भाजप

कळमनुरी-काँग्रेस

वसमत-शिवसेना