संपूर्ण देशाला हादरवणाऱया दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर यूपीए सरकारने मोठ्या तोऱयात महिलांच्या सुरक्षेसाठी एक हजार कोटी रुपयांचा निर्भया निधी तयार केला. मात्र, यातील एक रुपयाही गेल्या वर्षभरात वापरलेला नाही. महिलांसाठी एक रुपयाही खर्च न करता त्यांच्या संरक्षणाचे बाता मारण्याचे काम सोनिया गांधी यांना शोभत नाही, या शब्दांत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी चंद्रपूरमधील जाहीर सभेत कॉंग्रेसवर टीका केली.
चंद्रपूरचे भाजपचे उमेदवार हंसराज अहिर यांच्या प्रचारासाठी मोदी यांनी जाहीर सभा घेतली. या सभेला चंद्रपूरसह विदर्भातील इतर जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी उपस्थिती लावली होती. नेहमीप्रमाणे मोदी यांनी याही सभेत कॉंग्रेसवर निशाणा साधत सोनिया गांधींना काही प्रश्न विचारले.
ते म्हणाले, सामूहिक बलात्काराच्या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता. यानंतर यूपीए सरकारने महिलांच्या रक्षणासाठी एक हजार कोटी रुपयांच्या निर्भया निधीची घोषणा केली. मात्र, त्यातील एकही रुपया गेल्या वर्षात केंद्र सरकारने वापरलेला नाही. नुसतेच निधीची घोषणा करून काय उपयोग, असे सांगत मोदी यांनी सोनिया गांधी यांच्या तोंडात महिलांच्या रक्षणाची भाषा शोभत नसल्याचे वक्तव्य केले.
यूपीए सरकारनेच प्रसिद्ध केलेल्या एक अहवालात महिलांवर अत्याचार होणाऱय़ा पहिल्या दहा राज्यांपैकी सात ठिकाणी कॉंग्रेसचीच सरकारे आहेत. पहिल्या दहा राज्यांमध्ये भाजपचे किंवा त्याच्या मित्र पक्षांचे एकही सरकार नाही, याकडे लक्ष वेधत मोदी यांनी कॉंग्रेसशासित राज्यांमध्येच महिलांवर सर्वाधिक अत्याचार होत असल्याबद्दल आपल्याला लाज वाटत असल्याचे सांगितले.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून कॉंग्रेसला कधीही आदिवासींची आठवण झाली नाही. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या काळात आदिवासींसाठी स्वतंत्र मंत्रालय सुरू करण्यात आले, याकडे लक्ष वेधत कॉंग्रेसने आदिवासी समाजाची उपेक्षा केल्याची टीका मोदी यांनी केली. नक्षलवाद्यांनी मायभूमीत रक्ताचा सडा मांडायचा की हिरवळ उगवायची याचा विचार करायची वेळ आली असल्याचेही मोदी म्हणाले.