सांगोल्याचे काँग्रेसचे माजी आमदार अॅड. शहाजीबापू पाटील यांनी काँग्रेसची साथ सोडून देत शिवसेनेचा भगवा झेंडा खांद्यावर घेण्याचा निर्णय घेतली असून येत्या २० जून रोजी मुंबईत शिवसेना भवनात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा शिवसेना प्रवेश निश्चित झाला आहे. याबाबतची माहिती अॅड. पाटील यांनी स्वत: प्रस्तुत प्रतिनिधीला दिली.
सांगोला तालुक्यातील राजकारणात अॅड. पाटील हे शेकापचे ज्येष्ठ नेते, आमदार गणपतराव देशमुख यांचे कट्टर विरोधक समजले जातात. ते जर शिवसेनेत गेले तर आमदार देशमुख यांना तगडे आव्हान मिळू शकते. सांगोला विधानसभा निवडणुकीत १९९० पासून सलग पाच वेळा अॅड. शहाजीबापू पाटील यांनी आमदार देशमुख यांच्या विरोधात काँग्रेसकडून लढत दिली आहे. १९९५ साली त्यांनी देशमुख यांचा पराभवही केला होता. १९९९, २००४ व २००९ या विधानसभेच्या तिन्ही निवडणुकीत त्यांनी ८० हजारांपेक्षा जास्त मते घेतली होती.
अॅड. पाटील हे विद्यार्थिदशेपासून काँग्रेसमध्ये कार्यरत आहेत. ते पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते समजले जातात. विधान परिषद किंवा एखाद्या महामंडळावर वर्णी लागेल, अशी त्यांची अपेक्षा फोल ठरली असून पक्षात निष्ठावंतांपेक्षा उपऱ्या मंडळींचा सन्मान केला जातो. उपऱ्यांना ‘मलिदा’ तर निष्ठावंतांना ‘धत्तुरा’ असे काँग्रेस पक्षश्रेष्ठींचे धोरण असल्यामुळे पक्षात राहणे अवमानकारक ठरल्याचे अॅड. पाटील यांनी सांगितले. आपल्याबरोबर सांगोला तालुका काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, तालुका पंचायत समितीचे सदस्य, नगरसेवकांसह अनेक गावांचे सरपंच व हजारो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल होणार असल्याचा दावाही त्यांनी केला.