बाळासाहेब ठाकरे यांनी बोट धरून भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात वर आणले आणि त्यांचाच मुलगा आज राज्याचा मुख्यमंत्री असताना त्यांची खुर्ची काढण्याचा जो प्रयत्न चालू आहे हे निषेधार्थ आहे असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर टीका केली आहे. विदर्भ दौऱ्यावर असणाऱ्या नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत भाजपावर टीका केली आहे. पत्रकारांनी सरनाईक यांच्या पत्राविषयी प्रश्न विचारला असता भाजपा केंद्र तपास यंत्रणांच्या माध्यमातून शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला त्रास देत असल्याचे आपण पाहत असल्याचे म्हटले.

“केंद्रीय तपास यंत्रणांकडून विरोधी पक्षाच्या नेत्यांना नाहक त्रास दिला जात आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रातूनही ते स्पष्ट झालं आहे. दिल्लीतील राजकीय बॉसच्या इशाऱ्यावरून विरोधकांवर दबाव आणण्याचं काम भाजपा करत आहे. ईडीच्या माध्यमातून विरोधकांना कसा त्रास दिला जातो हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व किरीट सोमय्या यांच्या बोलण्यातूनही वारंवार उघड झालं आहे,” असे पटोले यांनी स्पष्ट केले.

सरकार पाच वर्षे चालेल

सरनाईक यांच्या लेटरबॉम्बनंतर रविवारी नाना पटोले यांनी हा शिवसेना पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे असे म्हटले होते. त्यानंतर सोमवारी पटोले यांनी पत्रकार परिषदेदरम्यान याबाबत भाष्य केलं आहे. “राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्षाचे सरकार भक्कम आहे. सरकारच्या कामगिरीवर जनताही समाधानी आहे, परंतु सत्ता नसल्यामुळं वैफल्यग्रस्त झालेला भाजपा सीबीआय, ईडी, आयकर, एनआयए या केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. सुरुवातीपासून शिवसेना आणि राष्ट्रवादीला त्रास दिला जात आहे. महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचे भाजपचे आतार्यंतचे सर्व प्रयत्न फेल गेले असून त्यांचा हा डाव सुद्धा यशस्वी होणार नाही. सरकार पाच वर्षे चालेल,” पटोले यांनी यावेळी सांगितले.

महाविकास आघाडी अस्थिर करण्यासाठीच मोदी सरकारचा हा प्रयत्न; काँग्रेसचा पलटवार

मुख्यमंत्र्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे

“महाराष्ट्रातील सत्तेपासून वंचित राहिल्यानं मागील दीड वर्षांपासून केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम भाजपा पद्धतशीरपणे करत आहे. विरोधी पक्षाचं सरकार अस्थिर करण्याचं, विरोधकांचा आवाज दाबण्याचे प्रकार सुरू आहेत. परंतु भाजपाचं सत्तेचं दिवास्वप्न हे स्वप्नच राहणार आहे. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून कोणत्याही दबावाला हे सरकार बळी पडणार नाही,” असंही पटोले म्हणाले.

प्रताप सरनाईक जेलचे पाहुणे होणारच; सरनाईकांच्या ‘लेटरबॉम्ब’नंतर सोमय्यांचा इशारा

राष्ट्रवादी-शिवसेना युतीला आमच्या शुभेच्छा!

२०२४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांची युती होणार असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. पण भाजपाविरोधात कोणतीही आघाडी उभी करायची असेल तर ती काँग्रेस पक्षाशिवाय होणे शक्य नाही असे पटोले म्हणाले. दरम्यान, पटोले यांनी पुन्हा स्वबळाचा नारा दिला आहे. काँग्रेस पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार आहे. मात्र महाविकास आघाडीला ५ वर्षे साथ देणार, असे त्यांनी सांगितले.