विधान परिषदेच्या उपसभापतिपदासाठी काँग्रेसतर्फे तीनजण इच्छुक असून मराठवाडय़ातून आमदार अमरनाथ राजूरकर यांचे नाव आघाडीवर आहे.

विधान परिषदेच्या नव्या सभापती व उपसभापतींची निवड करण्यासाठी परिषदेचे विशेष अधिवेशन ८ जुल रोजी घेण्याचे निश्चित झाले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी हे दोन पक्ष एकत्र आल्यास दोन्ही पदे या पक्षाला मिळू शकतात. काँग्रेसने उपसभापतिपदावर दावा सांगितला असून मधल्या काळातील चच्रेमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तो मान्य केला होता. त्यानुसार काँग्रेस पक्षात हालचाली सुरू आहेत. ज्येष्ठ सदस्य शरद रणपिसे, तसेच काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची नावे चच्रेत असतानाच वेगळ्या संदर्भाने आमदार राजूरकर यांचेही नाव पुढे आले आहे. प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय ही त्यांची जमेची बाजू असून त्यांचे नाव दिल्लीत पक्ष नेत्यांपर्यंत गेले आहे. राष्ट्रवादीने काही ज्येष्ठ सदस्यांना डावलून परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद धनंजय मुंडे यांच्या रुपाने तरुण आमदाराला दिले. या धर्तीवर काँग्रेसने तरुण आमदाराला संधी देण्याची सूचना पुढे आली असून पक्षाच्या काही ज्येष्ठ आमदारांचा राजूरकर यांना पाठिंबा असल्याचे कळते.

भाजपने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केले, ही बाब लक्षात घेता राजूरकर यांना उपसभापतिपदासाठी संधी दिल्यास राज्यात चांगला संदेश जाईल, अशीही मांडणी करण्यात येत आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष व विधानसभेतील विरोधी पक्षनेते कोणाची शिफारस करतात, याकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे. राजूरकर यांचे नाव पक्षाच्या प्रभारींपर्यंत गेले. यात पक्षाच्या एका खासदाराने पुढाकार घेतला आहे.