20 January 2018

News Flash

सांगलीत स्वबळाचे शिवधनुष्य काँग्रेसला पेलणार?

पंचायत समितीसाठी एकत्र बठका तरी निदान सुरू आहेत.

दिगंबर शिंदे, सांगली | Updated: January 13, 2017 1:17 AM

विधान परिषदेच्या सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये कागदावर भारी असलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव करून विजय मिळाल्याच्या पाठोपाठ नगरपालिका निवडणुकीत चांगले यश मिळाल्याने जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यातूनच सांगली जिल्हा परिषदेवर  झेंडा फडकवण्याचा निर्धार केला जात आहे. मात्र पक्षांतर्गत मतभेद आणि गटबाजीचा शाप असलेल्या काँग्रेसला हे शिवधनुष्य पेलणार का, असा प्रश्न पक्षातीलच मंडळी करीत आहेत.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नव्याने आमदार झालेले ८० वर्षीय मोहनराव कदम आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत एकहाती सत्ता मिळविण्याचे प्रयत्न करीत आहेत. आमदारकीची लढाई जिंकल्यानंतर तात्काळ झालेल्या नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकीमध्ये यश मिळाल्याने सध्या काँग्रेसचे ग्रहमान चांगले असल्याचे निदान कागदावर तरी दिसत आहे.

यातूनच वेगवेगळे गट असले तरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी एकत्र बठका तरी निदान सुरू आहेत. जिल्हा परिषदेसाठी या अगोदर प्रामुख्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशाच दुहेरी लढती होत आल्या आहेत. मात्र बदलत्या राजकीय समीकरणामध्ये भाजपबरोबरच काही ठिकाणी शिवसेनाही समोर उभी ठाकणार आहे. ही सर्व राजकीय पाश्र्वभूमी असताना काँग्रेसमध्ये मात्र निदान गटबाजी उफाळणार नाही याची दक्षता कोण घेणार?

एकीकडे काँगेस स्वबळाची भाषा करीत असताना जिल्ह्य़ात राष्ट्रवादी संपली असल्याचे सांगत निर्माण झालेली पोकळी केवळ काँग्रेसच भरून काढू शकतो हे कोणत्या गणितावर याचे उत्तर लवकरच मिळेल. मात्र एकीकडे स्वबळाची भाषा करीत असताना तिकडे शिराळ्यात भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्याविरुद्ध काँग्रेसने राष्ट्रवादीशी हातमिळवणी अगोदरच केली आहे, तर कवठे महांकाळमध्ये स्वाभिमानी विकास आघाडीची चूल मांडली आहे.

विटय़ात काँग्रेसची ताकद प्रदेश उपाध्यक्ष सदाशिव पाटील कितपत दाखवतात हा प्रश्न आहेच, पण त्याचबरोबर तासगावमध्ये पक्षाचे अस्तित्व काय? हे शोधावे लागते. मग कशाच्या जोरावर पक्षाचा झेंडा मिनी मंत्रालयावर लावणार याचे उत्तर मात्र आजच्या घडीला देता येत नाही. उमेदवार मागणीसाठी आजही राष्ट्रवादीच्या दारात गर्दी आहे. भाजपने इनकिमग सुरू केले असले तरी उपद्रवमूल्यापेक्षा पक्षाला लाभ किती यावरच पक्षप्रवेश राहणार आहे. राज्याच्या राजकारणापेक्षा स्थानिक आघाडय़ा कशा होतात, यावरच राजकीय सारीपाटावरील मांडणी राहणार हे मात्र निश्चित.

राष्ट्रवादीची तयारी

आघाडीसाठी राष्ट्रवादीने तयारी दर्शविली आहे. आघाडी झाल्यास जिल्ह्य़ात भाजप नावालाही राहणार नाही, अशी माजी मंत्री जयंत पाटील यांची भूमिका आहे. माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी मात्र स्वबळावर सत्तेची साद दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीत निर्माण झालेली कटुता अद्यापही कायम आहे. विधान परिषदेची जागा गमवावी लागली. इस्लामपूर आणि तासगाव या दोन बालेकिल्ल्यांमध्ये राष्ट्रवादीला नगरपालिका निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. यातूनच जिल्हा परिषदेची सत्ता कायम ठेवण्याचे राष्ट्रवादीपुढे मोठे आव्हान आहे. नगरपालिका निवडणुकीतील पराभवामुळे जयंत पाटील यांना मोठा धक्का बसला. जिल्हा परिषदेत जयंतरावांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीला जिल्ह्य़ात राजकीय धक्का देण्याकरिता काँग्रेस, भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना हे सारेच प्रयत्नशील आहेत.

First Published on January 13, 2017 1:16 am

Web Title: congress party in sangli election
  1. No Comments.