राज्यात सध्या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे खळबळ माजली आहे. परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून केलेल्या आरोपांतर भाजपाने आक्रमक भूमिका घेतली असून अनिल देशमुखांनी राजीनामा देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीने सावध भूमिका घेतली असताना काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यानेही अनिल देशमुखांनी राजीनामा द्यावा असं म्हटलं आहे. मात्र यानंतर राज्यातील काँग्रेसने सावध भूमिका घेतल्याचं चित्र आहे.

काँग्रेस नेते राशीद अल्वी यांनी अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला पाहिजे असं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. “परमबीर सिंह यांनी पदावर असताना कोणतंही वक्तव्य केलं नाही, कोणतीही तक्रार केली नाही. त्याचवेळी करायला हवं होतं. जर ते पोलीस आयुक्तपदी कायम असते तर कदाचित त्यांनी तक्रारच केली नसती. त्यांचा तपास व्हायला हवा. यासोबतच गृहमंत्र्यांचीही चौकशी झाली पाहिजे. यामध्ये एक नाही तर तीन-चार पोलीस अधिकारी सहभागी आहेत. त्यामुळे जोपर्यंत तपास सुरु आहे तोपर्यंत गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असा माझा सल्ला आहे. तपासाअंती जर गृहमंत्री निर्दोष असतील तर पुन्हा शपथ घेऊ शकतात,” असं राशीद अल्वी यांनी म्हटलं आहे.

यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये असणाऱ्या काँग्रेसच्या भूमिकेवरुन चर्चा सुरु झाली असून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विट करत भूमिका स्पष्ट केली आहे.

“अनेकजण कोणत्याही विषयावर आपलं मत व्यक्त करु शकतात. हे त्यांचं वैयक्तिक मत म्हणून ग्राह्य धरलं पाहिजे. फक्त पक्षाचे अध्यक्ष आणि प्रवक्त्यांचं वक्तव्य ही पक्षाची भूमिका म्हणून पाहिलं पाहिजे. राशीद अल्वी काँग्रेसचे अधिकृत प्रवक्ते नाहीत,” असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले निलंबित साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना दरमहा १०० कोटींची हप्तेवसुली करण्यास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्राद्वारे केला. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवारांनी अनिल देशमुखांची पाठराखण केली असून उचलबांगडी केल्यानंतरच आरोप का ? अशी विचारणा केली आहे. तसंच परमबीर यांनी दावा केलेले १०० कोटी नेमके कोणाला मिळाले, त्याचा तपशील त्यांनी पत्रात दिलेला नाही असंही सांगितलं आहे.