तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर मंगळवारी पावसाला पुन्हा सुरुवात झाली. दिवसभर पावसाची कधी रिमझिम तर कधी संततधार सुरू होती. जिल्ह्यात आजअखेर १२०६३.१५ मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे एस.टी. चे दोन मार्ग अंशत बंद तर काही मार्गावर पर्यायी वाहतूक वळविण्यात आली आहे. जिल्ह्यातील पाच धरणांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा झाला असून पावसाच्या वाढलेल्या पाणी पातळीमुळे अद्यापही १९ बंधारे पाण्याखाली आहेत.
शनिवारपासून पावसाने उघडीप घेतली होती. तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर वरुणराजाने पुन्हा दर्शन दिले. जिल्ह्याच्या सर्व भागात कमी-अधिक पाऊस झाल्याचे वृत्त आहे. पावसामुळे धरण व नद्यातील पाणी पातळीत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. जिल्ह्यात १ जूनपासून आजअखेर एकूण १२०६३.१५ मि.मी. पावसाची नोंद झाली असून गेल्या चोवीस तासांत ३०९.०२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात पावसाने कडवी, जंगमहट्टी, घटप्रभा, चित्री आणि कोदे ही पाच धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून राधानगरी धरण ९९ टक्के भरले आहे. राधानगरी धरणातून विद्युत विमोचकांतून दोन हजार व सांडव्यातून दोन हजार आठशे असा एकूण चार हजार आठशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आजपर्यंतच्या पावसामुळे १९ बंधारे अद्यापही पाण्याखाली आहेत. राधानगरी धरण ९९ टक्के, तुळशी ८३, वारणा ९२, दूधगंगा ७९, कासारी ९७, कुंभी ८६, पाटगाव ८१, चिकोत्रा ४५, तर जांबरे ३७ टक्के भरले आहे.
पंचगंगेचे राजाराम, सुर्वे, रुई, तेरवाड, इचलकरंजी, शिरोळ, िशगणापूर, भोगावती नदीवरील खडक कोगे, सरकारी कोगे, हळदी, राशिवडे, कासारीचे यवलूज, ठाणे-आळवे, पुनाळ तिरपण, वारणेचे चिंचोली, कोडोली, तांदूळवाडी, माणगाव असे एकूण १९ बंधारे अद्यापही पाण्याखाली गेले आहेत. वारणेतून १० हजार ६६८ क्युसेक, कासारीतून ९६८ क्युसेक, कडवीतून ६१८ क्युसेक, चित्रीतून २२८ क्युसेक, जंगमहट्टीतून २१२८ क्युसेक, घटप्रभेतून १३१५ क्युसेक, जांबरेतून ७८९ क्युसेक तर कोदेमधून ३४५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे एस.टी. चे दोन मार्ग अंशत बंद तर काही मार्गावर पर्यायी वाहतूक वळविण्यात आल्याचे कोल्हापूर राज्य परिवहनचे विभाग नियंत्रकांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविले आहे. संभाजीनगर आगाराच्या रंकाळा स्टँडवरून स्वयंभूवाडीकडे जाणाऱ्या गाडय़ा कोगे धरणावर पाणी आल्याने बीड माग्रे तर राधानगरी रंकाळा स्टँड गाडय़ा तारळे पुलावरील पाण्यामुळे गुडाळमाग्रे सुरू ठेवण्यात आल्या आहेत. गारगोटी हेळीवाडी गाडय़ा पावसामुळे रस्त्यावरील निसरडय़ामुळे सावर्डेपर्यंत सुरू ठेवण्यात आल्या आहेत. तर मलकापूर उदगिरी गाडय़ा रस्त्यावरील निसरडय़ामुळे भेंडवडेपर्यंत वाहतूक सुरू आहे.