मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर हजेरी लावून गायब झालेल्या पावसाने रविवारी शहरासह जिल्हय़ात दमदार हजेरी लावली. जिल्हय़ाच्या पश्चिमेकडील डोंगराळ भागात मुसळधार पाऊस झाला तर पूर्वेकडील तालुक्यांमध्ये पावसाची उघडझाप सुरू होती. महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गगनबावडा तालुक्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. पावसामुळे पाच ठिकाणी घरांची व एका हायस्कूलची पडझड झाली आहे. नदीपातळीत वाढ होऊ लागल्याने राजाराम बंधारा पाण्याखाली गेला आहे.
प्रतिवर्षांप्रमाणे जिल्हय़ात ७ जून रोजी मृग नक्षत्राचा मुहूर्त साधत पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर पावसाच्या अधूनमधून सरी बरसत होत्या, पण त्यामध्ये सातत्य नव्हते. शनिवारी रात्रीपासून मात्र जिल्हय़ात दमदार पावसाने हजेरी लावली. २१ जून रोजी सकाळपर्यंत जिल्हय़ात एकून ७१८ मिमी तर सरासरी ५९ मिमी इतका पाऊस झाला. सर्वाधिक पावसाची नोंद महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गगनबावडा येथे झाला. तेथे १८४ मिमी पाऊस झाला. आजरा तालुक्यातही पावसाने मिलिमीटरचे शतक ओलांडले १०१ मिमी पाऊस या तालुक्यात पडला. शहरातील पावसाची नोंद ३३ मिमी इतकी होती. शाहूवाडी-८१ मिमी, पन्हाळा-६७ मिमी येथेही समाधानकारक पाऊस झाला. पूर्वेकडील शिरोळ व हातकणंगले तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले. तेथे अनुक्रमे ५ व १५ मिमी पाऊस पडला. पावसामुळे नदीच्या पाणीपातळीमध्ये वाढ होऊ लागली आहे. येथील पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा पाण्याखाली गेला आहे.
पावसामुळे जिल्हय़ाच्या काही भागांमध्ये घरांची पडझड झाली आहे. पन्हाळा तालुक्यातील हरपवडे येथे एका घराचे नुकसान झाले. सुमारे साडेसात हजार रुपये नुकसान झाले आहे. शाहूवाडीतील थेरगाव येथे एका घराची पडझड झाली असून २० हजार रुपयांची पडझड झाली आहे. तर खेबवणेपकी धुमाकवाडी येथे सूरज हायस्कूलचे मोठे नुकसान झाले आहे. सव्वा लाखाहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक आकडा आहे. याशिवाय कौलव तालुका राधानगरी, मठगाव तालुका भुदरगड व आजरा तालुक्यात एका ठिकाणी घरांची पडझड झाली आहे.