वसई -विरार महानगरपालिकेतील १२२ कोटींचा घोटाळा

वसई-विरार महापालिकेतील विविध घोटाळ्यांची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करताच पोलीस सक्रिय झाले आहेत. पालिकेतील बहुचर्चित १२२ कोटी रुपयांच्या ठेकेदार घोटाळाप्रकरणी दोन महिन्यांनी एका ठेकेदाराला अटक करण्यात आली.

कर्मचाऱ्यांच्या वेतनाची रक्कम तसेच शासनाच्या कराराची रक्कम हडप करून १२२ कोटींचा अपहार केल्याप्रकरणी २५ ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

वसई-विरार महापालिकेत हजारो बोगस कर्मचारी दाखवून त्यांच्या नावाने पैसे उकळले जात होते. आता जे कंत्राटी कामगार अस्तित्वात आहेत, त्यांच्या पगारातील अर्धी रक्कम व शासनाचा कर या ठेकेदारांनी हडप केला होता. या ठेकेदारांनी २००० ते २०१८ पर्यंत कंत्राटी कामगारांना अर्धा पगार देऊन त्यांच्या पगारातील ९२ कोटी रुपये आणि शासनाचे कर न भरता २९ कोटी रुपये असे मिळून १२२ कोटी रुपयांचा अपहार केला होता. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील यांनी माहिती अधिकारातून माहिती मागवून हा घोटाळा उघडकीस आणला होता. या तक्रारीवरून २५ ठेकेदारांवर विरार पोलीस ठाण्यात फसवणुकीच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल झाले होते.

सुमारे दोन महिन्यांपूर्वी याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मात्र चौकशी सुरू आहे, अशी सबब सांगत कारवाई टाळण्यात येत होती. सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विरार येथे जाहीर सभा झाली होती. या वेळी मुख्यमंत्र्यांनी वसई-विरार महापालिकेतील घोटाळ्याची विशेष तपास पथक स्थापन करून चौकशी केली जाईल, असे जाहीर केले होते.

सोमवारी ठेकेदार घोटाळ्याप्रकरणी ‘आकाश एंटरप्राइज’च्या विलास चव्हाण या ठेकेदाराला अटक केली आहे. आम्ही या प्रकरणात पहिली अटक केली आहे. याशिवाय इतर आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असे विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल दबडे यांनी सांगितले. या अटकेनंतर सर्व ठेकेदार फरारी आहेत. या प्रकरणी वसई-विरार महानगरपालिकेचे अधिकारीदेखील अडचणी येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कर्मचाऱ्यांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या ठेकेदारांनी शासनाचीही फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाईची शक्यता आहे.

घोटाळा काय?

वसई-विरार महापालिकेची स्थापना २००९ साली झाली होती. त्यापूर्वी नगरपरिषद आणि ग्रामपंचायची होत्या. तेव्हापासून हे विशिष्ट ठेकेदार विविध कामांचा ठेका घेत होते. हे ठेकेदार पालिकेला वकील, अभियंते, डॉक्टर, आरोग्य व अग्निशमन कर्मचारी, संगणकचालक, लिपिक, मजूर, सुरक्षारक्षक, मजूर, वाहनचालक इत्यादी पुरवत होते. या ठेकेदारांकडे ३ हजार २६५ हून अधिक कर्मचारी कंत्राटी पद्धतीने कार्यरत होते. नियमाप्रमाणे कामगारांना किमान वेतन,  भविष्य निर्वाह निधी देणे आवश्यक होते. मात्र ठेकेदार कंत्राटी कामगारांना पूर्ण पगार न देता उर्वरित रक्कम स्वताच्या खिशात घालत होते. महापालिकेची स्थापना झाल्यापासून म्हणजेच जुलै २००९ पासून फेब्रुवारी २०१८ पर्यंत हे सर्व ठेकेदार महापालिकेत ठेका पद्धतीने कर्मचारी पुरवठा करण्याचे काम करत होते आणि तेव्हापासून कर्मचाऱ्यांची आर्थिक फसवणूक करीत होते. या ठेकेदारंनी ९२ कोटी २७ लाख रुपये हडप केले आहेत.  शासनाची मोठय़ा प्रमाणात करचोरी करून ठेकेदारांनी कोटय़वधी रुपयांची लूट केली आहे. या ठेकेदारांनी शासनाचा सेवा, व्यवसाय कर भरला नाही. माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार ठेकेदारांनी शासनाच्या सेवा आणि व्यवसाय कराचे तब्बल २९ कोटी ५१ लाख रुपये बुडवले आहेत. घोटाळ्यामध्ये पालिकेच्या आस्थापना विभागातील उपायुक्त, साहाय्यक आयुक्तांपासून लेखापरीक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचारी सहभागी असल्याचा आरोप आहे. देयकासोबत आवश्यक कागदपत्रे तसेच वैधानिक तरतुदींची पूर्तता करणे आवश्यक असते. त्यात सेवा, व्यवसाय कर भरल्याच्या पावत्या, कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी, विमा भरल्याच्या पावत्या सादर करणे, हजेरी पुस्तिका, पगारपत्रक सादर करणे आवश्यक होते. मात्र या ठेकेदारांनी लाखो रुपयांची बिले मंजूर करताना यापैकी काहीच सादर करत नव्हते आणि एका साध्या देयकावर लाखो रुपयांची देयकांची रक्कम मंजूर केली जात होती. किमान वेतन कायद्याबरोबर कामगारांशी संबंधित सर्व कायद्यांचे उल्लंघन करून या ठेकेदारांनी अनेक वर्षे ही लूट केली होती.

* वेदांत एन्टरप्राझेस /समीर विजय सातघरे

* मधुरा एन्टरप्राझेस/समीर विजय सातघरे

* गजानन एन्टरप्राझेस/अर्चना पाटील

* संखे सेक्युरिटी सर्विसेस  / दिनेश भास्कर संखे

* श्रीजी एन्टरप्राझेस/ योगेश घरत

* ओम साई एन्टरप्राझेस / विनोद पाटील

* बालाजी सव्‍‌र्हिसेस / मंगरुळे बी दिगंबरराव

* वरद एन्टरप्राझेस / सुरेंद्र बी भंडारे

* वरद इंजिनीरिंग / अभिजित गव्हाणकर

* स्वागत लेबर कॉन्ट्रॅक्टर / नंदन जयराम संखे

* क्लासिक एन्टरप्राझेस/ दिनेश पाटील

* द हिंद इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इंजिनीरिंग कॉर्प / किशोर नाईक

* सिद्धिविनायक एन्टरप्राझेस/ नितीन शेट्टी

* अथर्व एन्टरप्राझेस

* सद्गुरू ट्रेडिंग कं. / जिग्नेश देसाई

* शिवम एन्टरप्राझेस / तबस्सुम ए मेमन

* रीलाएबल एजेन्सी / झाकीर के मेमन

* चिराग लेबर कॉन्ट्रॅक्टर / राजाराम एस गुटुकडे

* आकाश एन्टरप्राझेस / विलास चव्हाण

* युनिव्हर्सल एन्टरप्राझेस / सुबोध देवरुखकर

* बी एल हौनेस्ट सेक्युरिटी / सुरेंद्र भंडारे

* जीवदानी फायर सव्‍‌र्हिसेस / किशोर पाटील

* आरती सुनील वाडकर / आरती सुनील वाडकर

* श्री अनंत एन्टरप्राझेस / रवी चव्हाण

* दिव्या एन्टरप्राझेस / कमलेश ठाकूर