देशभरात करोनाचं सावट कमी होताना दिसत आहे. करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने घट होत आहे. एकीकडे ही आनंदाची बाब असतानात महाराष्ट्रात मात्र चिंतेचं वातावरण आहे. महाराष्ट्रात ऑक्टोबरच्या पहिल्या १५ दिवसांत सप्टेंबरच्या तुलनेत कोविड चाचण्यांमध्ये तब्बल १८ टक्क्यांनी घट झाल्याची माहिती समोर आली आहे. ऑक्टोबरच्या सुरूवातीच्या काही दिवसात चाचण्यांचे प्रमाण ९१,००० वरुन ७५,००० वर घसरलं आहे. करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेवून त्यांच्या चाचण्या केल्यामुळे हे प्रमाण कमी झाल्याचे राज्याच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने या संदर्भात वृत्त दिलं आहे.

रविवारी १८ ऑक्टोबरला करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. या दिवशी ४६, ३१२ कोविड चाचण्या करण्यात आल्या. त्यातील केवळ ५९८४ चाचण्या या पॉझिटिव्ह आल्या आहेत. महाराष्ट्रात मागील १०४ दिवसांमध्ये सर्वात कमी रुग्ण या दिवशी आढळून आले आहेत.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालानुसार सप्टेंबरच्या शेवटच्या १५ दिवसांत सुमारे १४ लाख चाचण्या करण्यात आल्या. या तुलनेत ऑक्टोबरच्या पहिल्या १५ दिवसात चाचण्यांची संख्या ही ११ लाखांच्या आसपास होती. महाराष्ट्रात आतापर्यंत ८१.८५ लाख चाचण्या करण्यात आल्या आहेत. तसेच भारतात सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रातच आहेत.

करोना चाचण्यांचे प्रमाण हे ९% -१०% कमी झालं आहे, कारण सप्टेंबरच्या सुरूवातीच्या आठवड्यात रूग्णांच्या संख्येत अंदाजे १. ५ लाखापर्यंत घट झाली आहे. तर १५ ऑक्टोबरपर्यंत हे प्रमाण ७०,००० वर गेले आहे असं राज्याचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितलं. त्यामुळेच इन्फ्लूएन्झासारख्या आजार असलेल्या रूग्णांची संख्या कमी झाली आहे असंही आवटे म्हणाले.

महाराष्ट्राच्या नऊ जिल्ह्यांमध्ये झालेल्या पावसामुळेही या चाचण्याचे प्रमाण कमी झालं आहे. सोलापुरात कोविड चाचण्यांची संख्या ही अर्ध्यावर आली आहे. सर्वात जास्त चाचण्या करण्यात येत असलेल्या ठाण्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या उपक्रमाद्वारे स्क्रीनिंग करताना लोकांची रॅपिड अँटिजेन टेस्टही करण्यात येत आहे. तर मुंबईत ऑक्टोबरमध्ये दरदिवशी १५ हजार चाचण्या करण्यात आल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.