|| विद्याधर कुलकर्णी
मुकुल माधव फाऊंडेशनचे भगीरथ प्रयत्न
पुणे : शिजविलेले अन्नपदार्थ, किराणा, धान्यवाटप, वैद्यकीय उपकरणे आणि प्राणवायू सांद्रित्रांचे वितरण या आणि अशा वेगवेगळ्या माध्यमांतून मानवतेचा सेतू उभारत करोना साथीच्या काळात गरजूंना तत्परतेने मदत करण्यासाठी मुकुल माधव फाऊंडेशनचे भगीरथ प्रयत्न सुरू आहेत. दोन लाखांहून अधिक कुटुंबे या मदतीची लाभार्थी ठरली आहेत. करोना प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून ते दुसऱ्या लाटेमध्येही फाऊंडेशनच्या सामाजिक कार्याचा परीघ देशभरामध्ये विस्तारला आहे.

आरोग्य, शिक्षणाची समान संधी, समाजकल्याण, ग्रामविकास, स्वच्छता आणि महिला सबलीकरण अशा विविध क्षेत्रांमध्ये गेल्या दोन दशकांपासून मुकुल माधव फाऊंडेशन कार्यरत आहे. फिनोलेक्स उद्योगसमूहाच्या रितू छाब्रिया या फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली करोना प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर फाऊंडेशनच्या कार्याचा परीघ विस्तारत गेला. करोनाने सारे व्यवहार ठप्प झाले.  हाताला काम नसल्यामुळे अनेकांवर स्थलांतरित होण्याची वेळ आली. त्या कालखंडामध्ये देशभरात फाऊंडेशनतर्फे गरजूंना शिधावाटप करण्यात आले.

अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांची मदत करण्याबरोबरच स्थलांतरितांना आणि त्यामुळे नोकरी गमावली होती अशा लोकांना मदत करण्यासाठी उद्योग क्षेत्रातील भागीदार आणि स्वयंसेवकांसह विविध संस्थांचे सहकार्य घेण्यात आले.

‘गिव्ह विथ डिग्निटी’

आर्थिकदृष्ट्या मागास भागातील नागरिकांना शिधा आणि स्वच्छता संचाची भेट देण्याच्या उद्देशातून फाऊंडेशनने ‘गिव्ह विथ डिग्निटी’ हा प्रकल्प यशस्वीपणे राबविला.

विजया दशमी म्हणजेच दसऱ्यापासून या प्रकल्पाची सुरुवात झाली. दिवाळी आणि नंतर नाताळपर्यंत हा प्रकल्प सुरू होता. या संचामध्ये देण्यात आलेल्या वस्तू लघुउद्योजकांकडून खरेदी करण्यात आल्या. त्याद्वारे १२० लघुउद्योजकांना आधार मिळाला. ‘गिव्ह विथ डिग्निटी’ हा प्रकल्प भारतातील २४ राज्यांत ७३ हजारांहून अधिक कुटुंबांना आधार देत तीन लाखांहून अधिक व्यक्तींच्या जीवनामध्ये सकारात्मक परिणाम घडवून आणणारा ठरला.

विधायक उपक्रम

फाउंडेशनतर्फे ससून रुग्णालयाला दोन कोटी रुपयांच्या अर्थसाह््यातून अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची भेट देण्यात आली.

शेतकऱ्यांच्या १३० मुलांची दोन वेळेच्या भोजनाची जबाबदारी घेतली असून यामध्ये मराठवाडा आणि विदर्भ येथून स्पर्धा परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागांमध्ये २०९ शौचालयांची उभारणी करण्यात आली आहे. वाडा तालुक्यातील केलटान, सापाने आणि कारळगाव येथे ७७ शौचालये उभारण्यात आली.

निसर्ग चक्रीवादळाने बाधित झालेल्या रत्नागिरी आणि रायगडमधील नागरिकांना ५० लाख रुपयांची मदत करण्यात आली असून या दोन जिल्ह्यांतील ३३३ कुटुंबांना उभे करण्याच्या प्रयत्नांना यश आले आहे.

फाउंडेशनतर्फे ७९० अंगणवाडी सेविकांना आरोग्यसंचाची भेट देण्यात आली.

एकल महिला शेतकऱ्यांच्या (आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नी) सक्षमीकरणासाठी फाउंडेशनने फिक्की फ्लो पुणे चॅप्टर, पुण्यातील साई मित्र परिवार, कळंब येथील पर्याय सामाजिक संस्था आणि तुळजापूर येथील कृषी विज्ञान केंद्र यांच्या सहकार्याने उपक्रम राबविले. त्याअंतर्गत ४१२ महिला शेतकऱ्यांना मोफत सोयाबीन आणि तुरीचे बियाणे वितरित करण्यात आले.

करोना साथ आणि टाळेबंदीच्या काळात मुकुल माधव फाउंडेशनने सहृदयतेने मदत करण्याचा प्रयत्न केला. ज्येष्ठ नागरिक, एचआयव्ही बाधित महिला, अंगणवाडी सेविका, शिक्षक, माथेरान येथील घोडेस्वारीवर उदरनिर्वाह करणारे व्यावसायिक अशा समाजातील सर्व घटकांना वस्तुरूपी मदत करून आम्ही खारीचा वाटा उचलला आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील सर्वांचे फाउंडेशनच्या कार्याला सहकार्य लाभले याचा मनस्वी आनंद वाटतो. – रितू छाब्रिया, व्यवस्थापकीय विश्वस्त, मुकुल माधव फाउंडेशन

 

 

 

 

मुकुल माधव फाऊंडेशनच्या मदतीचे लाभार्थी शिधावाटप – ९० हजार कुटुंबे

तयार अन्नपदार्थांचे वितरण – १० हजारांहून अधिक व्यक्ती

वैद्यकीय उपकरणांची भेट

प्राणवायू सांद्रित्र – ७०४

वैद्यकीय साधने – ७५

व्हेंटिलेटर – ७९

सीपॅप यंत्र – ७

योद्ध्यांसाठी संच – ५५००