राज्यात करोनाचा प्रादुर्भाव आता झपाट्याने वाढताना दिसत आहे. आज (गुरुवार) दिवसभरात विरार शहरात १० नव्या रुग्णांना करोनाची लागण झाल्याचे  उघड झाले आहे. यामुळे शहरातील एकूण करोनाग्रस्त रुग्णांची संख्या ६३ एवढी झाली आहे. वसई विरार शहरातील करोनाग्रस्तांची संख्या आता झपाट्याने वाढताना दिसत आहे.

आज आढळून आलेल्या १० नव्या रुग्णांमध्ये  नालासोपारा आणि विरारमधील प्रत्येकी ४ तर वसईतील २ रुग्णांचा समावेश आहे. वसईच्या ओम नगर येथे  मृत्यू झालेल्या व्यक्तीचा वाहनचालक, एका वृत्तवाहिनीचा कर्मचारी, नालासोपारामधील मृत व्यक्तीची पत्नी आणि मुलगा, नालासोपारा मधील एका करोनाबाधीत रुग्णाचा ९ वर्षांचा मुलगा विरार मधील करोनाग्रस्त तरुणाची आई आदींचा सआेहमाी वेश आहे. या सर्वांवर पालिकेच्या शहरातील विविध अलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.

वसई-विरार मधील करोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या  ६३ आहे. यामध्ये वसई- २४, नालासोपारा- २४, विरार- १५, नायगाव- ००  अशी आकेडवारी आहे.   अन्य  ०५ जणांचा मृत्यू झालेला आहे.

राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईतील करोनाबाधितांची संख्या देखील झपाट्याने वाढत आहे. आज दिवसभरात एकट्या मुंबईत तीन जणांच्या मृत्यूसह आतापर्यंत 107  नव्या रुग्णांची भर पडली आहे. मुंबईतील करोनाबाधितांचा एकूण आकडा आता 2 हजार 043 वर पोहचला आहे.या आकडेवारीत आतापर्यंत मृत्यू झालेल्या 116 जणांचा समावेश आहे.

याचबरोबर महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गुरुवारी दुपारपर्यंत आणखी १६५ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून आता महाराष्ट्रातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३ हजारांच्या पुढे गेली आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत महाराष्ट्रातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३ हजार ८१ झाली आहे. राज्यातील ११ जिल्हे करोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. शिवाय ३ जिल्ह्यांतील काही भाग हे करोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. लॉकडाउननंतरही अद्याप राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येतील वाढ थांबत नाही, ही चिंतेची बाब मानली जात आहे.