सोलापुरात आज शुक्रवारी सायंकाळपर्यंत १३ नव्या  करोनाबाधित  रूग्णांची भर पडली. तर दोन पुरूषांचा बळी गेला आहे. आतापर्यंत एकूण रूग्णसंख्या ३४३ तर मृतांची संख्या २४ झाली आहे. दरम्यान, करोनामुक्त झालेल्या ११३ रूग्णांना घरी पाठविण्यात आले आहे.

आज नव्याने आढळून आलेल्या रूग्णांमध्ये अरविंद धाम पोलीस वसाहतीत राहणाऱ्या एका पोलीस कर्मचा-यासह छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रूग्णालयातील नर्सिंग विद्यार्थी वसतिगृहात राहणाऱ्या परिचारिकेचा समावेश आहे. तर मृतामध्ये शासकीय रूग्णालयाजवळ  राहणाऱ्या एका परिचारिकेच्या पतीचा समावेश आहे. सोलापुरात करोनाची बाधा झालेल्या पोलिसांची संख्या २० च्या घरात गेली असून त्यातील एका सहायक फौजदाराचा मृत्यू झाला आहे. या मृत पोलीस कर्मचा-याच्या कुटुंबीयांना शासनाकडून ५० लाख रूपयांचे साह्य मिळण्यासाठी शासनाकडे सोलापूर शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी प्रस्ताव पाठविला आहे.

महाराष्ट्रात करोनाचे १५७६ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर करोनामुळे ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्याच्या घडीला २१ हजार ४६७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत तर ६ हजार ४५४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत करोनाची लागण होऊन महाराष्ट्रात १०६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. आत्तापर्यंत करोनाची लागण झालेल्या महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या २९ हजार १०० इतकी झाली आहे. आज ५०५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.