घरात राहण्याचा आदेश असूनही बाहेर फिरणाऱ्या तिघांवर रायगड पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. हे तिघेही परदेशातून भारतात आले होते. श्रीवर्धन तालुक्यातील खारशेत भावे येथे होम क्वारंटाइनचे शिक्के असणाऱ्या तीन जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. असा गुन्हा दाखल होण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव असलेल्या देशांतून परतणाऱ्या नागरिकांना निगराणी कक्षात आणि होम क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात येत आहे. तसंच होम क्वारंटाईन असणाऱ्या व्यक्तींच्या हातावर शिक्के मारण्यात येत असून त्यांना घरातून बाहेर फिरण्यास बंदी केलेली आहे. असे असतानाही श्रीवर्धन तालुक्यातील खारशेत भावे येथील तिघेजण बाहेर फिरत होते. तिघेही नुकतेच परदेशातून परतले होते. सध्या त्यांच्यात कोणत्याही प्रकारची करोना व्हायरस ची लक्षणे दिसली नसली तरी ते घराबाहेर फिरत होते. त्यामुळे या तिघांवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी दिघी सागरी पोलीस ठण्याचे सहायक पोलिस निरीक्षक महेंद्र शेलार यांनी कलम 188 व 269 नुसार गुन्हा दाखल केला आहे.