रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे जिल्ह्यातील लॉकडाउनची मुदत आणखी एक आठवड्याने, येत्या १५ जुलैपर्यंत वाढवली आहे. गेल्या आठवडभरात जिल्ह्यामध्ये एकूण १५२ करोनाबाधित रूग्ण सापडले असून ७० जण पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत. यामध्ये लागण होण्याचे प्रमाण जास्त आढळून आल्यामुळे ही मुदत वाढवली आहे. जीवनावश्यक वस्तुंची दुकाने वगळता सर्व दुकाने या कालावधीत बंद राहणार आहेत. मात्र ५  हजार लोकशाहीपेक्षा कमी गावांना त्यातून वगळण्यात आले आहे.

दरम्यान मंगळवारी सायंकाळपासून बुधवारी सायंकाळपर्यंतच्या २४ तासात नव्याने ३२ करोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे गेल्या मार्च महिन्यापासून बाधित रुग्णांची एकूण संख्या ८१३, तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५२२  झाली आहे. सध्या एकूण बाधित रुग्णांची संख्या २६३ आहे.  तसेच आत्तापर्यंत एकूण २८ जण या महामारीमुळे मृत्युमुखी पडले आहेत. जिल्ह्यातील विविध रूग्णालयांमधून बुधवारी एकूण १५ रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

रत्नागिरी शहरातील भाट्ये रोड, राजिवडा, नर्सिंग हॉस्टेल, शंखेश्वर गार्डन गीता भुवन, मौजे नरशिंगे, मौजे साईनगर कुवारबाव व गद्रे कंपनी, सन्मित्र नगर हे सात क्षेत्र करोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. जिल्ह्यात सध्या  ७४ ॲक्टिव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात २४ गावांमध्ये, २० ९  दापोली मध्ये ८ गावांमध्ये, खेड मध्ये ९ गावांमध्ये, लांजा तालुक्यात ६, चिपळूण तालुक्यात २० गावांमध्ये,मंडणगड तालुक्यात १ आणि राजापूर तालुक्यात ६ गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.