जगभरात करोना आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहे. तेथील रुग्णांची संख्या आणि आपल्या देशातील रुग्णांची संख्या लक्षात घेतली तर आपण ऑगस्टपर्यंत शून्यावर येईल अशी शक्यता डॉ. रोहिदास बोरसे यांनी व्यक्त केली. पण यासाठी नागरिकांनी घरीच बसून सरकारनं दिलेल्या नियमांचे पालन करावे, असं आवाहन देखील त्यांनी केले.

करोनामुळे संपूर्ण जगात हाहाकार उडाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भारतासह सर्वच देशांमध्ये शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र देखील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात देखील करोनाचे रुग्ण वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी डॉक्टर प्रयत्न करीत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमादरम्यान करोनातून बऱ्या झालेल्या व्यक्तींसोबत आणि उपचार करणार्‍या काही डॉक्टरांसोबत चर्चा केली. यात पुण्यातील डॉ. रोहिदास बोरसे यांचाही समावेश होता. ते पुण्यातील नायडू सांसर्गिक आजार रुग्णालयामधील रुग्णांवर उपचार करीत आहे. यानिमित्तानं डॉ. बोरसे यांच्यासोबत लोकसत्ता ऑनलाईननं संवाद साधला.

डॉ. रोहिदास बोरसे म्हणाले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत दोन दिवसांपूर्वी फोन करून माहिती जाणून घेतली. या संवादमधून अधिक जोमानं काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे. माझ्यासह अनेक डॉक्टर तिथे येणार्‍या रूग्णांना सेवा देण्याचं काम करत आहेत. येणारा रुग्ण सुरुवातीला भीतीत असतो, पण आम्ही सतत संवाद साधतो. त्या व्यक्तीला त्यामधून बाहेर काढतो. आजपर्यंत पुण्यातून ७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सर्व रुग्णांची तब्येत ठणठणीत आहे. तर दुसर्‍या बाजूला सरकारनं तातडीने लॉकडाउन जाहीर केला आहे. पण याच लॉकडाउनमध्ये बाधित रुग्णांची वाढण्याची शक्यता आहे. कारण यापूर्वीच अनेकांच्या शरीरात कानाला, नाकाला, डोळ्याला आणि तोंडाला सतत हात लावल्याने तो व्हायरस गेल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भविष्यात ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजपासून पुढील १५ दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे.त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये,’ असं आवाहन त्यांनी केलं.

‘चीन, इटली, स्पेन आणि अमेरिका या देशांसारखी परिस्थिती भारतात निर्माण होणार नाही. याची काळजी आपलं सरकार घेत आहे. येणार्‍या काळात ससून रुग्णालयाच्या आवारातील इमारतीमध्ये करोना बाधित रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. येणार्‍या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी प्रशासन सज्ज आहे,’ असं त्यांनी सांगितलं.

कोण आहे डॉ. बोरसे?

पुण्यातील बी. जे. महाविद्यालयामध्ये मेडिसीन विभागात प्राध्यापक म्हणून मागील ३१ वर्षांपासून कार्यरत आहेत. अनेक साथीच्या आजारांच्या काळात ते नायडू रूग्णालयात सेवा देण्याचे काम करतात. त्यातील महत्वाचे म्हणजे २००९ मध्ये स्वाइन फ्लू सारखा आजार आला. तेव्हा देखील उपचार करण्याचे काम डॉ. रोहिदास बोरसे यांनी केले आहे.