लोकसत्ता वार्ताहर

पालघर : करोनाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यत आयोजित करण्यात येणाऱ्या यात्रा उत्सवावर बंदीचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी काढले आहेत.

पालघर जिल्ह्यत मार्चच्या मध्यावधीपासून अनेक ठिकाणी उरूस, बोहाडा, यात्रा व काही प्रमाणात उत्सव साजरे केले जातात. या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात भाविक, नागरिकांची गर्दी जमते. अशा वेळेला या ठिकाणी करोना नियमांचे पालन न झाल्यास करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. यासाठी ही गंभीर बाब लक्षात घेत जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व कार्यक्रमांसह उत्सवांवर ही बंदी घातली आहे. या नियमांचे पालन न केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत असे कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांवर व त्यात सहभागी होणाऱ्यांवर  कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

दरम्यान,  महाशिवरात्री निमित्त दरवर्षी लाखो भाविकांची गर्दी होणारी वाडा तालुक्यातील तिळसेश्वरची यात्रा यावर्षी प्रथमच रद्द करण्यात आली आहे. गेल्या शंभर वर्षांंत ही यात्रा रद्द होण्याची पहिलीच वेळ असल्याचे  सांगण्यात येत आहे.महाशिवरात्रीच्या  दिवशी ठाणे, पालघर जिल्ह्यतून लाखो भाविक या यात्रेसाठी येत असतात. पहाटे चार वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत येथील पांडव कालीन असलेल्या महादेवाच्या मंदिरात भाविकांची  दर्शनासाठी गर्दी होते.    करोनाच्या पाश्र्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करुनच  भाविकांनी मंदिरातील महादेवाचे मुखदर्शन घ्यावे असे आवाहन वाडा तहसीलदार उद्धव कदम यांनी शिव भक्तांना केले आहे.