करोनाची तपासणी करणाऱ्या मेयोतील पीसीआर यंत्रात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी करोनाशी निगडीत सर्व तपासण्या खोळंबल्या आहेत. सध्या देशात दिवसेंदिवस करोना बाधितांचा आकडा वाढतच आहे. अशा परिस्थितीत मेयो येथील करोनाची तपासणी करणाऱ्या पीसीआर यंत्रात तांत्रिक बिघाड झाल्याने अडचणीत आणखी भर पडल्याचे दिसत आहे.

विशेष बाब म्हणजे पुण्यातील तंत्रज्ञच या यंत्राची दुरुस्ती करू शकतात. मात्र सध्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वाहतूकीवर निर्बंध असल्याने त्या ठिकाणी तंत्रज्ञांना पोहचण्यास अडचणी येत आहेत. सद्यस्थितीस मरकज येथे जावून आलेल्यांचे नमूने तपासणी अभावी पडून आहेत. जिल्हा प्रशासनाला रुग्णालय प्रशासनाने याबाबत माहिती दिली आहे.

तपासणी सुरू करण्यासाठी पीसीआर यंत्र पोहचले, पण तपासणी सुरू करण्यासाठी परवानगीसह इतर इन्स्टॉलेशनबाबत बरेच काम शिल्लक आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनापुढे करोनाबाबत मोठा पेच निर्माण झाला आहे. मेयोच्या प्रयोगशाळेवर सध्या विदर्भासह, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढच्या काही जिल्ह्यातील तपासणीचा भार आहे.