“करोना विरोधातील या युद्धात आपण सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे. कारण आपण जर एकत्र राहिलो नाही तर मात्र पुन्हा एकदा लॉकडाउन कडक पद्धतीने करावा लागेल. ही सूचना मी नाही तर करोना आपल्याला देतो आहे.” असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज(रविवार) नागरिकांना सूचक इशारा दिला. राज्यातील करोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. मुंबई, पुणे, नाशिकसह विदर्भातील शहरांमध्येही दररोज करोनाचे मोठ्यासंख्येने रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाउन सुरू होतो की काय? अशी भीती सर्वसामान्यांच्या मनात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला.

“राज्यात उद्यापासून राजकीय, सामाजिक व धार्मिक मिरवणुका, मोर्चे, यात्रांवर बंदी”

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “माझे कुटुंबं माझी जबाबदारी ही जशी मोहीम आपण राबवली, तेव्हा आपण सर्वजण घरामध्ये होता. घरा-घरांमध्ये आपले आरोग्य व अन्य सर्व यंत्रणेचे कर्मचारी येऊन आपली विचारपूस करत होते. पण आता ही मोहीम पुन्हा करायची झाली, तर अवघड आहे. याचं कारण तेव्हा तुम्ही घरांमध्ये होता आता सगळे घराबाहेर आहात. मग या यंत्रणेवर किती ताण टाकायचा. मी म्हटलं की आता लॉकडाउन करावा लागेल का? तर काही जण म्हणतात तुम्ही तपासण्या वाढवा. तपासण्या देखील वाढवल्या आहेत. पण एका यंत्रणेवर आपण ताण टाकायचा आणि आपण बेभानपणाने वागायचं हा त्या यंत्रणेशी केलेला अमानुषपणा आहे, असं मी म्हणेल.”

मी जबाबदार मोहीम सुरू –
“मला असं वाटतं माझे कुटुंबं माझी जबाबदारी ही जशी मोहीम आपण राबवली व यशस्वी केली. तशी एक नवीन मोहीम आपण राबवली पाहिजे, ती म्हणजे ”मी जबाबदार” होय मीच जबाबदार.. हे प्रत्येकाने सांगायचं आहे मीच जबाबदार आहे. याचा अर्थ असा आहे की मी घराबाहेर पडताना मास्क वापरेलच, वेळोवेळी हात धुणार व अंतर ठेवणार. मला खात्री आहे तुम्ही मी जबाबदार ही मोहीम यशस्वी कराल.” असं देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवलं.

लॉकडाउन करायचा का? –
तसेच, “लॉकडाउन करायचा का? हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो आहे. या प्रश्नाचं उत्तर मी पुढील आठ दिवस मी तुमच्याकडून घेणार आहे. मी बघणार ज्यांना लॉकडाउन नको आहे, ती लोकं मास्क वापरणं, हात धुणं व अंतर ठेवणं हे पाळतील आणि ज्यांना लॉकडाउन हवा आहे, ते विनामास्करचे फिरतील. बघूयात किती जणांना लॉकडाउ हवा आहे व किती जणांना नकोय. माझं तर म्हणणं स्पष्ट आहे, मास्क घाला लॉकडाउन टाळा, शिस्त पाळा लॉकडाउन टाळा. असं शेवटी मुख्यमंत्र्यांनी जनतेला उद्देशून सांगितलं.