प्रशांत देशमुख

वर्धा : निवारागृहाच्या आश्रयास आलेल्या मजूर व विद्याथ्र्यांनी सुटकेसाठी आकांततांडव सुरू केल्याने प्रशासनावर दंडूके उगारण्याची वेळ आली आहे. संचारबंदीच्या काळात जिल्ह्यात ठिकठिकाणचे मजूर अडविण्यात आले. राजस्थान, तेलंगणा, आंध्रप्रदेश, ओडिसा, मध्यप्रदेश, बिहार, उत्तरप्रदेश अशा व अन्य राज्यातील मजूर व विद्यार्य़ांची संख्या आठ हजारावर पोहोचली. व्यवस्थेबद्दल समाधानी असणारे हे मजूर मात्र आता अस्वस्थ झाले आहे. त्यांची चिडचिड वाढली असून उपोषण, भांडणे, मारामाऱ्या असे प्रकार निवारागृहात सुरू झाले आहे. अग्रसेन भवन येथे मुक्कामास असलेल्या तेलंगणाच्या विद्याथ्र्यांनी उपोषणाचे अस्त्र उगारत गावाला परत जाण्याचा घोषा लावला. मदनमोहन धर्मशाळेतील मजूरांनी दारू पिण्यासाठी बाहेर जाण्याचा हट्ट धरला. तर न्यू इंग्लिश शाळेत मजूरांच्या दोन गटात मारामारी झाली.

आणखी वाचा- Coronavirus : समुपदेशन करणाऱ्या परिचारिकेसह पतीच्या जाळल्या दुचाकी

शेवटी गृहरक्षकदलाने दंडूका दाखवत शांत केले. अग्रसेन भवनात पोलीसांना पाचारण करण्याची वेळ आली. आमचा विलगीकरणाचा कालावधी संपल्याने आम्हाला परत जावू द्या, अशी सगळ्यांची सकाळ संध्याकाळ मागणी असल्याचे उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी नमूद करीत अतिरिक्त सुरक्षा या ठिकाणी आजपासून पूरविण्यात येणार असल्याचे त्यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

आणखी वाचा- लॉकडाउनमध्ये माहेरी जाण्याचा हट्ट, पतीने नकार दिल्याने मुलांसह विहीरीत मारली उडी आणि…

सेवाकार्यात असलेले वैद्यकीय मंचचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे हे म्हणाले की या आश्रीतांना लवकरात लवकर त्यांच्या गावी जाण्याची व्यवस्था करणे हाच एक मार्ग आहे. तर एका निवारागृहाची व्यवस्था सांभाळणारे सचिन अग्निहोत्री यांनी स्थलांतरीतांच्या गावी जाण्याबाबत न्यायालयाने केलेल्या सुचनेवर लक्ष वेधले.