News Flash

“राज ठाकरे म्हणजे, करोना काळात राजकारण न करता महाराष्ट्र जनतेच्या मागे उभा असलेला एकमेव ‘राजा’ माणूस”

केंद्र सरकारच्या त्या निर्णयानंतर मराठी दिग्दर्शकाकडून राज ठाकरेंचं कौतुक

फाइल फोटो (सौजन्य: Twitter/RajThackeray वरुन साभार)

देशामध्ये करोनाचा वेगाने फैलाव होत असल्याने केंद्र सरकारने लसीकरणाची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय सोमवारी घेतला. याअंतर्गत १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. लसीकरणाचा पुढचा टप्पा १ मेपासून सुरू होणार असून, केंद्राने राज्ये, खासगी रुग्णालये, औद्योगिक आस्थापनांना थेट निर्मार्त्यांकडून लस खरेदी करण्यास मुभा दिली आहे. या निर्णयाचं राज्यातील ठाकरे सरकारनेही स्वागत केलं आहे. असं असतानाच दिग्दर्शक केदार शिंदे यांनी मात्र या निर्णयानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं कौतुक केलं आहे. यासंदर्भातील एक ट्विट केदार शिंदे यांनी केलं आहे.

राज ठाकरे यांनी पत्राद्वारे केंद्र सरकारकडे केलेल्या मागण्या मान्य झाल्याचा उल्लेख केदार शिंदेंनी आपल्या ट्विटमध्ये केलाय. “राज ठाकरे, आपण एका पत्राने केलेल्या मागण्या केंद्र सरकारने मान्य केल्या. अपुनने एकही मारा लेकीन सॉलिड मारा के नाही?,” असं शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच राज यांचा उल्लेखही शिंदे यांनी, “या काळात राजकारण न करता महाराष्ट्राच्या जनतेच्या मागे उभा असणारा एकमेव राजा”, असा केलाय.

काही दिवसांपूर्वीच लसींची संख्या वाढवण्यासाठी हाफकीन सारख्या संस्थांना लस निर्मितीची परवानगी द्यावी अशी मागणी आपण केली होती, जी पंतप्रधानांनी मान्य केली असे ट्विट राज ठाकरे यांनी केलं होतं. यासाठी मी पंतप्रधानांचा आभारी असून केंद्र सरकार या महामारीवर मात करण्यासाठी कायमच सहाय्य करेल अशी आशाही राज यांनी व्यक्त केली होती.

मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांचे आभार

देशातील २५ वर्षांपुढील सर्वांना लस देण्याची गरज असून, तसा निर्णय घेण्याची विनंती काही दिवसांपूर्वीच मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली होती. केंद्र शासनाने त्यावर सकारात्मक पाऊल उचलत १८ वर्षे वयापुढील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान आणि आरोग्यमंत्री यांचे मी मनापासून आभार मानतो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. राज्यात या अनुषंगाने पुरेपूर नियोजन केले जाईल. लशीचा पुरवठा वेळच्या वेळी होत राहील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2021 9:12 am

Web Title: covid 19 vaccine for all kedar shinde says raj thackeray is only leader who is fighting for people of maharashtra scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “…तर मग तन्मय फडणवीसला लस दिलीच कशी काय गेली?”
2 विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची ‘अँटीजेन’ चाचणी करणार
3 खाटांचा तुटवडा
Just Now!
X