करोनाचे संक्रमण आता ग्रामीण भागांमध्ये होऊ लागले आहेत. मी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक त्या सोयीसुविधा उभारण्यासंदर्भातील आदेश दिले असून मुंबईप्रमाणे इतर शहरांमध्ये सोयीसुविधांची कमतरता भासणार नाही यासंदर्भातील काळजी घेण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. शिवसेनेचे खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. याच विशेष मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी राज्यातील आरोग्य सुविधांसंदर्भात प्रशासनाच्या पातळीवर तयारी केली जात असल्याची माहिती दिली.

करोनाविरुद्धच्या युद्धामध्ये अनेक आरोग्य सेवांची राज्यामध्ये मोठ्या प्रमणात सोय करण्यात आली त्यानंतर अनेक ठिकाणांहून रुग्णांना बेड मिळत नसल्याची, सोयीसुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या. त्या जेव्हा तुमच्यापर्यंत आल्या तेव्हा एवढं काम केल्यानंतरही अशा तक्रारी ऐकायला मिळाल्यावर तुमच्या भावना काय होत्या, असा प्रश्न या मुलाखतीमध्ये संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारला.

नक्की वाचा >> उद्धव ठाकरेंनी सांगितलं करोना काळामध्ये मंत्रालयात न जाण्याचं कारण, म्हणाले…

“…तिथे ही तक्रार थोड्याफार प्रमाणात राहणार”

“मला काम करायंच आहे आणि जनतेला वाचवायचं आहे,” असं सांगतच उद्धव यांनी या प्रश्नाचं उत्तर देण्यास सुरुवात केली. “तुम्ही जी परिस्थिती सांगतायत ती सुरुवातीला मुंबईमध्ये होती हे प्रामाणिकपणे मान्य केलं पाहिजे. या विषाणूचा प्रादुर्भाव, साथीचा प्रसार आणि आपल्याकडच्या सुविधा यांचे प्रमाण विषम होतं. आता मुंबईत आपण अजूनही सुविधा वाढवत आहोत. पण आता हा विषाणू ग्रामीण भागांमध्ये आणि इतर शहरांमध्ये पसरत आहेत. तिथे आपण या सुविधा अजून उपलब्ध करुन देऊ शकलो नाही किंवा तिथे अजून या सुविधा तयार होत आहेत तोपर्यंत तिथे ही तक्रार थोड्याफार प्रमाणामध्ये राहणार,” असं उद्धव ठाकरे करोना सुविधांच्या कमतरेसंदर्भात उत्तर देताना म्हणाले.

“…तो काळ मुंबईमध्ये करोना केंद्र उभारण्यासाठी वापरला”

“सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मी सांगितलं आहे की, जिथे जिथे तुम्हाला आवश्यकता असेल तिथे तिथे तात्काळ या सुविधा निर्माण करा. पण मुंबईमध्ये जेव्हा सुविधा तयार केल्या तेव्हा पावसाळा नव्हता. त्यामुळे मोकळ्या मैदानामध्ये आपण या सुविधा तयार करु शकतो. बीकेसी, गोरेगावचं नेस्को, वरळीचं डोम, रेस कोर्सला करोना सेंटर तयार करतोय. मुलुंड चेकनाका, दहिसरमध्ये सेंटर उभारत आहोत. या सर्व ठिकाणी आपण हे करु शकलो कारण आपण हे तयार करताना पावसाळ्यापूर्वीच्या काळाचा फायदा घेतला. मुंबईमध्ये या साथीची आधी सुरुवात झाली होती. आता काय होतं आहे की गावामध्ये आणि इतर शहरांमध्ये पाऊस सुरु झाला आहे. त्यामुळे आता करोना सेंटर उभारण्यासाठी मैदाने उपलब्ध होणार नाहीत,” याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं.

नक्की वाचा >> ‘राज्यातील अनेक शहरांमध्ये पुन्हा पुन्हा लॉकडाउन का करावं लागत आहे?’; मुख्यमंत्र्यांनी दिलं उत्तर

ग्रामीण भागांमध्ये या ठिकाणी उभारावी लागणार केंद्र

“आपण करोना सेंटर्सची सुविधा उभारताना सर्व काळजी घेत आहोत. म्हणजे येथे पूर्ण मलनिस्सारणाची ड्रेनेज लाइन टाकून दिली आहे. कारण या सुविधा उभारल्यानंतर पुन्हा वेगळा त्रास होऊ नये याचा विचार करुन हे उभं केलं आहे. पावसामुळे आता अनेक गावागावांमध्ये आणि इतर शहरांमध्ये आधीपासूनच छप्पर असणारे मोठे हॉल्स किंवा गोदामे असतील अशा ठिकाणी करोना केंद्र उभारावी लागणार आहेत. हे ही त्या शहरांमध्ये नसतील तर रिकाम्या इमारतींना प्राधान्य दिलं जाईल. आजही आपण काही शहरांमध्ये शाळा, कॉलेज आणि हॉस्टेल हे क्वारंटाइनसाठी घेतले आहेत,” असंही उद्धव ठाकरेंनी नमूद केलं.