राज्यातील करोना संसर्ग अद्याप थांबलेला नाही. मात्र मागील काही दिवसांपासून दररोज आढळणाऱ्या करोनाबाधित रूग्णांच्या तुलनेत करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ही सातत्याने अधिक आढळून येत आहे. काल पर्यंत या दोन्ही संख्येत मोठा फरक आढळून येत होता. मात्र आज हे अंतर कमी झाल्याचे दिसून आले आहे. आज दिवसभरात राज्यात २९ हजार १७७ रूग्ण करोनातून बरे झाले, तर २६ हजार ६७२ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. याशिवाय राज्यात करोनामुळे मृत्यू होणाऱ्या रूग्ण संख्येतही वाढ सुरूच आहे. आज राज्यात ५९४ रूग्णांना करोनामुळे जीव गमावावा लागल्याचे समोर आले आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ५१,४०,२७२ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( रिकव्हरी रेट) ९२.१२ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर १.५९ टक्के एवढा आहे.

तिसऱ्या लाटेतही लहान मुलांमधील करोना कसा रोखणार?; मुख्यमंत्र्यांनी साधला टास्क फोर्सशी संवाद!

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,३०,१३,५१६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५५,७९,८९७ (१६.९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २६,९६,३०६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २१,७७१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ३,४८,३९५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Covid Crisis : राज्यातील सहा हजार बालरोग तज्ज्ञांना कोविड टास्क फोर्सने केले मार्गदर्शन!

कोविड विरुद्धच्या लढ्यात डॉक्टरांना मोठ्या प्रमाणावर सहभागी करून घेण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेस वाढता प्रतिसाद असून, आज(रविवार) या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील ६ हजार ३०० बालरोग तज्ज्ञांना राज्य शासनाच्या कोविड विषयक बालरोग तज्ज्ञ टास्क फोर्सने वैद्यकीय उपचारांबाबत मार्गदर्शन केले. यावेळी मुलांमध्ये कोविड आणि कोविड्शी संबंधित मानसिक व भावनिक आरोग्याकडे लक्ष देण्यावर देखील चर्चा झाली. लहान मुलांमधील संसर्गाबाबत बेसावध राहू नका, वेळीच डॉक्टरला दाखवा, कोविडविरुद्धची आपली एकजुटीची साखळी मजबूत ठेवून या विषाणूला पराभूत करू असे यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.